- नितिन पंडीत
भिवंडी ( दि. ४ ) भिवंडी कशेळी ठाणे या रस्त्यावर खड्ड्यांमुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून संपूर्ण रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. तर पाऊस पडला की संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी तलावांचे स्वरूप निर्माण होते. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या मार्गावर दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीचा त्रास स्थानिक नागरिकांसह वाहन चालक व प्रवाशांना रोज सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे व रोजच्या वाहतूक कोंडीची समस्या निकाली लावण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील आठवड्यात ठाणे भिवंडी या रस्त्यांची पाहणी करीत या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी व वाहतूक नियंत्रण सुनियोजित करावे अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागासह , वाहतूक पोलीस व टोल वसूल करणाऱ्या कंपनीला दिल्या होत्या , मात्र पालकमंत्र्यांच्या दौऱ्या नंतरहि रस्त्याची दुरावस्था जशीच्या तशीच असल्याने पालकमंत्र्यांच्या दौऱ्याचा कोणताही परिणाम टोल कंपनीवर झालेला दिसत नाही.
सोमवारी या रस्त्यावरील पुर्णा ते कोपर दरम्यान रस्त्यावरील खड्ड्यात तीनचाकी टेम्पो कलंडून पलटी झाला . सुदैवाने बाजूने जाणारे वाहन पुढे निघून गेल्याने जीवितहानी टळली तर चालक याने दुसऱ्या बाजूने बाहेर येत नागरीकांच्या मदतीने टेम्पो सरळ करत उभा केला . या मार्गावरील खड्ड्यां मुळे अनेक अपघात होत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग व टोल कंपनी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत.