ठाणे - हर घर मे बिजलीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. परंतु पावसाळा संपत नाही तोच ठाण्यासह, नवी मुंबई आणि मुंबईच्या काही भागात तात्पुरत्या भारनियमनाचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत. गुरुवारपासून महावितरणने हे भारनियमन सुरू केले असून, ते केव्हा कमी होणार याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नाही. कोळशाचे प्रमाण कमी झाल्याने हे भारनियमन करावे लागत असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. परंतु यामुळे अगदी भारनियमनमुक्त भागातही तब्बल तीन तासांचे चटके सहन करावे लागत आहेत. काही भागात नऊ तास वीज गायब झाली आहे.ऑक्टोबर सुरू झाला आणि विजेची मागणी वाढू लागली आहे. त्यानुसार गुरुवारी राज्यात 17900 मेगावॉट विजेची मागणी झाली, परंतु उपलब्धता मात्र 15700 मेगावॉट विजेची होती. वीज निर्मिती केंद्रांना पुरेसा कोळसा उपलब्ध होत नसल्याने वीज निर्मितीत घट झाल्याचेही महावितरणने सांगितले आहे. विजेची मागणी आणि उपलब्धता यात तफावत निर्माण झाल्याने राज्यात ज्या भागात सर्वाधिक वीजहानी आहे. अशा भागात ए, बी, सी, डी, ई, एफ व जी 1, जी 2 व जी 3 या गटांतील फीडर्सवर तात्पुरते भारनियमन सुरू करण्यात आल्याची माहिती महावितरणने दिली आहे.परंतु अचानकपणे आणि तेही ऑक्टोबर हीटमध्ये सुरू झालेल्या या भारनियमनाचे चटके मात्र ग्राहकांना तीव्र स्वरुपात बसू लागले आहेत. त्यानुसार ए गटातील ठाणे 1, दोन, वागळे इस्टेट आणि मुलुंड या भागात सव्वा तीन तासांचे दोन टप्यात, ग्रुप बी मध्ये पुन्हा ठाणे एक, दोन आणि तीन वा वागळे आणि मुलुंडचा काही भाग या ठिकाणी 4 तास, त्यानंतर अशा प्रकारे ग्रुप सीमध्ये पावणे पाच तास, ग्रुप डीमध्ये 5.30 तास, ईमध्ये 7 तास, जी 1 मध्ये 7.45 तास, जी 2 मध्ये 8.30 तास आणि जी 3 मध्ये तब्बल 9.15 तासांचे दोन टप्यात भारनियमन सुरू झाले आहे. त्यामुळे या भारनियमनाच्या झळा ठाण्यासह नवी मुंबई आणि भांडुप, मुलुंडच्या अनेक भागांना बसण्यास सुरू झाला आहे. आधीच ऑक्टोबर हीटच्या घामाच्या धारा आणि त्यात अचानक सुरू झालेल्या भारनियमनामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र चांगलाच हैराण झाला आहे.दरम्यान, या विजेच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी महावितरणने सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीसाठी 1 हजार मेगावॉटची खुल्या बाजारातून विजेची खरेदी केली आहे. तसेच ऑक्टोबर महिन्यासाठी कोयना जलविद्युत प्रकल्पातून अंदाजे 7 टीएमसीपर्यंत पाणी वापरून वीज उपलब्ध करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एनटीपीसी कंपनीला ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील पूर्व नियोजित देखभाल करीता बंद ठेवण्यात येणा-या संचास बंद न करण्याच्या सुचना दिल्या आहेत. एनटीपीसीच्या मौदा प्रकल्पातून 500 मेगावॉट व नवीन सुरु झालेल्या सोलापुर प्रकल्पातून जवळपास 300 मेगावॉट अशी 80 मेगावॉट वीज उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. महावितरणने असे उपाय करण्यास सुरवात केली असली तरी देखील अचानकपणो आणि पुढे कीती दिवस हे भारनियमन सुरु राहणार याची माहिती नसल्याने त्याचा झळा मात्र सर्वसामान्यांना बसण्यास सुरवात झाली आहे. विशेष म्हणजे लघु उद्योगांना देखील या भारनियमनाच्या झळा बसू लागल्याने त्याचा परिणाम उद्योगांना सहन करावा लागला आहे.
ठाण्यासह नवी मुंबई आणि मुंबईतील काही भागात तात्पुरते भारनियमन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2017 7:54 PM