ठाणे : क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड पॉइंट्स करून देण्याच्या आमिषाने सायबर दराेडेखाेरांनी श्रीधरन राधाकृष्णन अय्यर (वय ७३) यांच्या बँक खात्यातून तब्बल साडेतीन लाखांची रक्कम लांबवल्याची घटना उघड झाली. या प्रकरणी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती चितळसर पोलिसांनी मंगळवारी दिली.
यातील तक्रारदार अय्यर यांच्या मोबाइलवर १८ ऑक्टोबरला रात्री ८ वाजता एका भामट्याने एक लिंक पाठवली होती. या लिंकसोबत रिवॉर्ड पॉइंट्स करून देऊ, असाही मजकूर त्याने पाठविला हाेता. त्यानंतर श्रीधरन यांनी लिंक ओपन केली असता, काही वेळातच त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डमधून एकूण तीन लाख ५० हजारांची रक्कम परस्पर वळती करून काढण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अय्यर यांनी चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या घटनेचा तपास वरिष्ठ पाेलिस निरीक्षक गिरीश गाेडे करीत आहेत.