लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: नामांकित कंपन्यांमध्ये वाहने आकर्षक भाड्याने देण्याचे तसेच वाहन कर्जाचे हप्तेही फेडण्याचे प्रलोभन वाहन मालकांना दाखवून त्यांची वाहने परस्पर परराज्यात विक्री करणा-या टोळीतील अश्फाक नूर अहमद सिद्धीकी उर्फ समीर यास वागळे इस्टेट पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २२ लाख ७२ हजार ५०० रुपयांची चार वाहनेही हस्तगत केल्याची माहिती वागळे इस्टेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी दिली.फसवणुकीने मिळवलेल्या या वाहनांची अश्फाक आणि जाफर यांनी या वाहनांची गुजरातमध्ये दीड ते पाच लाखांपर्यत विक्री केली. या वाहनांपैकी एका वाहनाचा वापर गुजरातमध्ये चक्क दारुच्या तस्करीसाठी होत होता, अशीही माहिती तपासामध्ये समोर आली आहे. वागळे इस्टेट भागातील एका रहिवाशाची कार भाडयाने लावून देतो आणि वाहन कर्जाचे हप्ते भरतो, अशी बतावणी अश्फाकने एका वाहनधारकाकडे केली होती. प्रत्यक्षात कार ताब्यात मिळाल्यानंतर तिची परस्पर गुजरातमध्ये विक्री केली. या टोळीने सुरुवातीला बँकेचे हप्तेही भरले. पुढे ते भरलेच नाही. त्यानंतर संपर्क क्रमांकही बंद ठेवला. त्यामुळे संशय बळावल्यामुळे संबंधित वाहन मालकाने याप्रकरणी ५ आॅक्टोंबर २०१८ रोजी रोजी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाकडून तपास सुरु असतानाच दहिसर पोलिसांनी यातील अश्फाक याच्यासह तिघांना अटक केली. यातील दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांचा चौथा साथीदार मात्र पसार झाला आहे. या माहितीच्या आधारे ठाणे न्यायालयाच्या आदेशाने अश्फाकचा पाच दिवसांपूर्वी वागळे इस्टेट पोलिसांनी ताबा घेतला. तोच या टोळीचा मुख्य सूत्रधार असल्याचीही बाब उघड झाली. वाहनांची गुजरातमध्ये विक्री केल्याची त्याने कबूली दिली. मुंब्य्रातून अशाच प्रकारे फसवणुकीने त्यांनी विकलेल्या दोन आणि मुलूंड येथील एक अशा २२ लाख ७२ हजार ५०० रुपयांची चार वाहने गुजरात येथून हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीने अशाच प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहनही वागळे इस्टेट पोलिसांनी केले आहे. अश्फाकच्या चौथ्या साथीदाराचाही शोध घेण्यात येत असल्याचे सहायक आयुक्त निलेवाड यांनी सांगितले.