लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात पावसाने गेल्या तीन दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उष्णतेत वाढ झाली आहे. मात्र, पावसाने आतापर्यंत तब्बल दहा जणांचा बळी घेतला आहे. यातील मृतांच्या नातेवाइकांना शासनाने जाहीर केलेले प्रत्येकी पाच लाख रुपयांचे अर्थसाह्य याप्रमाणे एकूण ५० लाख रुपयांचे वाटप ठाणे जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर केले आहे.
पावसाच्या या कालावधीत जिल्ह्यात गेल्या काही वर्षांच्या तुलनेत आतापर्यंत सर्वाधिक १० जणांचा बळी गेला आहे. यामध्ये सर्वाधिक ठाणे शहर परिसरात भूस्खलनाने पाच जणांचा बळी गेला आहे. तर या दरम्यान इतर दुर्घटनांत मीरा-भाईंदर मनपा परिसरातील एकाचा मृत्यू झाला आहे. रस्ते अपघातात भिवंडीतील एकासह उल्हासनगर आणि शहापूरमधील प्रत्येकी एक जण मयत झाला आहे. याच शहापूरमधील एकाचा इतर दुर्घटनेत मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. या मृतांच्या नातेवाइकांना शासनाने नैसर्गिक आपत्तीच्या निधीचे चार लाख आणि सीएम निधीतून एक लाख असे मिळून प्रत्येक मृताच्या नातेवाइकांना आतापर्यंत ५० लाखांचे अर्थसाह्य वाटप केल्याच्या वृत्ताला जिल्हा प्रशासनाने दुजोरा दिला आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या २४ घटना
जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसापैकी जुलैमध्ये सर्वाधिक आपत्तीला तोंड द्यावे लागले. या कालावधीत जिल्ह्यातील पूरस्थितीसह भूस्खलन, रोड अपघात, पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याच्या दुर्घटनांचा समावेश आहे. या अतिवृष्टीमुळे ठाणे शहरात दोन जीवघेण्या घटनांनी नोंद आहे. याशिवाय शहापूर परिसरात सर्वाधिक २० ठिकाणांची नोंद आहे. तर भिवंडी आणि उल्हासनगर या परिसरात प्रत्येकी एक दुर्घटना आदी आतापर्यंत जिल्ह्यात २४ ठिकाणी नैसर्गिक आपत्तीच्या दुर्दैवी घटना घडल्या असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. या दुर्घटनांपैकी जिल्ह्यात भूस्खलनाने पाच जणांचा जीव गेलेला आहे. अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय इतर जीवघेण्या घटनांत दोन जण असे १० मृत्यू यंदाच्या पावसात आतापर्यंत झालेले आहेत.