लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : करार संपल्यावर घर सोडण्यास सांगितल्याने भाडेकरूने घर मालकिणीच्या बहिणीवर हल्ला केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मारहाण, विनयभंग आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
अंबरनाथच्या पालेगाव परिसरारील रिलायन्स रेसिडेन्सी संकुलात उर्मिला जगताप आणि त्यांची बहीण अर्चना जगताप यांचे फ्लॅट्स आहेत. उर्मिला या याच संकुलात वास्तव्याला असून, त्यांच्या बहिणीचा फ्लॅट मॉन्टी भरोडिया यांना भाड्याने दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात भाडेकरार संपल्याने उर्मिला यांनी मॉन्टी यांना फ्लॅट सोडण्यास सांगितले. मात्र, यावरून त्यांच्यात वाद होऊन झटापटी झाली. त्यानंतर, काही वेळाने मॉन्टी हे काही लोकांना घेऊन पुन्हा उर्मिला यांच्या घरी गेले आणि तिथे उर्मिला यांच्यासह त्यांच्या दोन लहान मुलांनाही मारहाण करत घरातील सामानाची तोडफोड केली.
तीन दिवस तक्रार घेतली नाहीया घटनेनंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गेलेल्या उर्मिला यांची पोलिसांनी तीन दिवस तक्रार न घेता त्यांना चकरा मारायला लावल्या, असा उर्मिला यांचा आरोप आहे. अखेर बुद्धिस्ट फोरमच्या सदस्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेताच गुन्हा दाखल केला. मॉन्टी याच्यासह त्याची पत्नी, भाऊ, सासू, ८ ते ९ महिला, ४ पुरुष यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.