मीरा राेड : मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत रहिवासी वा वाणिज्य भाडेकरू ठेवताना त्याची माहिती २४ तासांच्या आत स्थानिक पोलीस ठाण्यात देण्याचे आदेश पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी फौजदारी प्रक्रिया दंड संहितेनुसार जारी केले आहेत. भाडेकरूची माहिती न देणाऱ्यांना कायदेशीर कारवाईला सामाेरे जावे लागणार आहे.
मीरा-भाईंदर आणि वसई-विरार ही झपाट्याने वाढणारी शहरे आहेत. या शहरांमध्ये राज्यातीलच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यांतून नागरिक येथे राहायला आणि कामधंद्यासाठी येतात. याशिवाय, या दोन्ही शहरांमध्ये बांगलादेशी, नायजेरियन नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात वास्तव्य असते. यात अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असतात किंवा गुन्हे करून नंतर ते पसार होतात. त्यांची माहिती पोलिसांकडे दिली गेली नसल्याने आरोपींना शोधणे अवघड हाेते. त्यामुळेच घर, जागा, हॉटेल, दुकाने आदी कोणत्याही स्वरूपाच्या निवासी वा वाणिज्य वापराच्या मालमत्ता भाड्याने देताना त्याची माहिती पोलिसांकडे असली पाहिजे, जेणेकरून वेळ पडल्यास आवश्यक ती मदत करणे वा कारवाई करणे पोलिसांना सोयीचे ठरेल. त्यातूनच पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी २७ नोव्हेंबरला फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ च्या (१)(२) अन्वये आदेश जरी करून भाडेकरूची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक केले आहे.
मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयांतील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील सदनिका, घर, दुकाने, हॉटेल, मोकळ्या जागा आदी भाड्याने देताना आधी त्यांची शहानिशा करून भाड्याचे रीतसर करार करून त्याची माहिती २४ तासांच्या आत स्थानिक पोलीस ठाण्यात द्यावी लागणार आहे.
ही द्यावी लागणार माहितीभाड्याने देणाऱ्या व घेणाऱ्या या दोन्ही पक्षकारांनी स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन त्यांचे व सोबत असलेल्या कुटुंबीय वा सहकारी यांचे छायाचित्र, मूळ गाव वा देशाच्या पुराव्यासह पत्ता, ज्या दलालामार्फत भाडेकरार झाला त्याची माहिती, परकीय नागरिक असल्यास पासपोर्ट आणि ज्या कारणासाठी भाड्याने या भागात स्थलांतरित झाले आहेत, त्याची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे.