कल्याण : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण रेल्वेस्थानक परिसराचा विकास करण्यासाठी मागवलेली निविदा जास्त दराची असल्याने ती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता या कामासाठी नव्याने निविदा मागविण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या स्मार्ट सिटीच्या बैठकीत घेण्यात आला.
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीस आयुक्त गोविंद बोडके, महापौर विनीता राणे, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, प्रकल्प अधिकारी तरुण जुनेजा आदी उपस्थित होते. स्टेशन परिसराच्या विकासासाठी ३९४ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. मात्र, या कामासाठी ५९६ कोटींची निविदा प्राप्त झाली आहे. त्यामुळे सदस्यांनी कंपनी व्यवस्थापनास मागच्या बैठकीत धारेवर धरले. ५९६ कोटींची निविदा रद्द करण्याचा निर्णय सदस्य मंडळाने यापूर्वी घेतला होता. स्टेशन परिसरासाठी नव्याने सविस्तर अहवाल तयार करण्याचे सदस्यांनी सूचित केले होते. त्यामुळे स्टेशन परिसर विकासासाठी नव्याने निविदा मागविण्याच्या निर्णय मंगळवारी बैठकीत घेण्यात आला आहे.
शहरात सीसीटीव्ही बसवणे आणि वाहतूक नियमनासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी १२६ कोटी रुपये खर्चाची निविदा काढली होती. ही निविदा स्मार्ट सिटी कंपनी व्यवस्थापनाने स्वीकारली होती. या निविदेला या बैठकीत मंजुरी दिली गेली आहे. त्यामुळे आता शहरात दोन हजार ६०० सीसीटिव्ही लावण्यात येणार आहेत. शहरात पूर येणार असेल तर त्याची पूर्वसूचना नागरिकांना मिळावी, यासाठी या स्मार्ट एलिमेंटमध्ये सुविधा आहे. याबरोबर शहरात जीआयएस या कार्यप्रणाली यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सहा कोटी रुपये खर्चाच्या निविदेसही यावेळी मान्यता देण्यात आली आहे. पार्किंग पॉलिसी संदर्भात सूचना स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी दिल्या होत्या. त्यांच्या सूचनांचा अंतर्भाव पार्किंग पॉलिसच्या सविस्तर प्रकल्पात करण्यात आला आहे.
स्मार्ट सिटीमधील सगळ्यात महत्त्वाकांक्षी व मोठा प्रकल्प हा कल्याण स्टेशन परिसराचा आहे. ट्रकबेल सल्लागार कंपनीने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा, अशी तंबी सदस्यांनी या बैठकीत दिली. कंपनीने स्टेशन परिसराचा सविस्तर प्रकल्प अहवाल योग्य प्रकारे तयार न केल्यास त्यांचे काम रद्द करण्याबाबतची कारवाई येत्या स्मार्ट सिटी बैठकीत केली जाईल, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात स्मार्ट सिटीची बैठक होणार नाही. मात्र, निवडणुकीनंतर स्टेशन परिसर विकासाच्या निविदेचा विषय चर्चिला जाऊ शकतो. त्यामुळे पुन्हा स्टेशन परिसर विकासाच्या निविदा प्रक्रियेस आचारसंहितमुळे ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
पार्किंग सुविधा, सौरऊर्जा प्रकल्प राबवणारशहरातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी पार्किंगची सुविधा देणे, सौरऊर्जा प्रकल्प राबविणे तसेच कल्याणमधील काळा तलावाचा दुसऱ्या टप्प्यातील विकास करण्याचे काम स्मार्ट सिटी अंतर्गत घेण्यात आले आहे. या तिन्ही विकासकामांचे सविस्तर प्रकल्प अहवाल या बैठकीत सदस्यांपुढे मंजुरीसाठी ठेवले असता त्यांना मंजुरी देण्यात आली.