कल्याण : केडीएमसीच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण रेल्वेस्थानक परिसराच्या विकासासाठी मागवलेली निविदा सप्टेंबरमध्ये रद्द करण्यात आली होती. निविदेची रक्कम व निविदाधारक कंपनीकडून भरण्यात येणारी निविदेची रक्कम यात प्रचंड तफावत येत असल्याने महापालिकेने इपीसी तत्वावर निविदा मागविली आहे. ही निविदा ८ नोव्हेंबरला उघडण्यात येणार आहे.
महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पास आॅगस्ट २०१६ मध्ये मंजुरी मिळाली. या प्रकल्पांतर्गत २८ प्रकल्पांची यादी महापालिकेने तयार केली होती. त्या सगळ्यात प्रथम कल्याण स्टेशन परिसराच्या विकासावर अधिक भर दिला होता. त्याकरिता प्रथम मध्य रेल्वेशी स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी स्थापन केलेल्या कंपनीने सामंजस्य करार केला. मध्य रेल्वेने मंजुरी दिल्यावर स्टेशन परिसराच्या विकासाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला गेला. त्यानंतर प्रकल्पाची प्राकलन रक्कम तयार करून निविदा मागविली गेली. निविदेची रक्कम ३९४ कोटी रुपये नमूद केली होती. पहिल्या वेळेस आलेल्या निविदेत निविदाधारकाने जास्तीची रक्कम नमूद केली होती. त्यामुळे ती फेटाळण्यात आली.दुसऱ्या वेळेस कंत्राटदार कंपनीने ५९६ कोटींची निविदा भरली. निविदेचा खर्च व प्राप्त निविदा यात २०२ कोटींचा फरक होता. इतक्या मोठ्या फरकाची निविदा मान्य करण्यात अडसर असल्याने १० सप्टेंबरच्या स्मार्ट सिटीच्या बैठकीत सदस्य मंडळाने ही निविदा रद्द केली. तसेच नव्याने सविस्तर अहवाल तयार करण्याचे आदेश मंडळाने दिले होते. त्यानुसार विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात स्टेशन परिसर विकासासाठी निविदा काढली आहे. यावेळी इपीसी तत्वावर ही निविदा आहे.
निविदेचे प्रकलन स्मार्ट सिटी व महापालिकेने तयार केले असून त्याच्या खर्चाची रक्कम प्रशासकास माहिती आहे. इपीसी तत्वावरील निविदाधारक प्रकल्पाच्या खर्चाची रक्कम स्वत: नमूद करतील. ही रक्कम प्रशासकाच्या रक्कमेशी ताळमेळ खात असल्यास निविदा मंजूर केली जाईल. ही निविदा ८ नोव्हेंबरला उघडली जाणार आहे.
सिग्नल, सीसीटीव्हीचे सर्वेक्षण सुरूस्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील प्रमुख चौकात सीसीटीव्ही आणि वाहूतक व्यवस्था सुरक्षित व्हावी, यासाठी सिग्नल बसवले जाणार आहेत. त्यासाठी ७१ कोटींचा खर्च येणार आहे. या निविदेस १० सप्टेंबरच्या स्मार्ट सिटीच्या बैठकीत मंजुरी मिळाली होती. वाहतूक शाखा व पोलिसांच्या मदतीने सिग्नल यंत्रणा व सीसीटीव्ही कुठे बसवायचे, याचे सर्वेक्षण सुरु आहे. त्यानंतर प्रत्यक्ष सिग्नल यंत्रणा व सीसीटीव्ही बसविण्यास सुरुवात होणार आहे.