उल्हासनगर : महापालिका टेंडर घोटाळ्यावरून भाजप व शिवसेना शिंदे गटाचे नेते आमने-सामने आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र एका आठवड्यानंतर आरोप-प्रत्यारोपकर्ते स्थानिक नेते व बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण व खासदार श्रीकांत शिंदे यांना घोटाळ्या बाबत प्रश्न करताच, त्यांनी जय श्रीरामची घोषणा देऊन घोटाळ्याच्या प्रश्नाला बगल दिली आहे.
उल्हासनगर महापालिका हद्दीत हजारो कोटीच्या निधीतून विविध विकास कामे सुरू आहेत. विकास कामातील टेंडर घोटाळ्यावरून भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी व आमदार कुमार आयलानी यांनी एका आठवड्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन १०० कोटीचा टेंडर घोटाळा झाल्याचा आरोप केला. एका ठेकेदाराला कामे मिळवून देण्याचे काम शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरुण अशान करीत असून बोगस कागदपत्र सादर करणाऱ्या या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. तसेच रामचंदानी व आमदार आयलानी यांनी पत्रकार परिषदेच्या दुसऱ्या दिवशी महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी भेट घेऊन वादग्रस्त कंपनीची चौकशी करून काळ्या यादीत टाकण्याचे निवेदन दिले. तसेच भाजपच्या तब्बल २२ माजी नगरसेवकांनी आयुक्तांना लेखी पत्र देऊन ठेकेदारांला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.
शहर स्थानिक शिवसेना शिंदे गट नेते व भाजप नेते यांच्यात टेंडर घोटाळ्यावरून आरोप -प्रत्यारोप सुरू होते. दरम्यान गोलमैदान येथे रामजन्मभूमी मंदिराची प्रतिकृती मंदिर भाजपने उभे केले असून याठिकाणी १ फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. या मंदिराच्या दर्शनासाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे व भाजपचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण येऊन गेले. यावेळी खासदार शिंदे व चव्हाण यांना टेंडर घोटाळ्यावरून छेडले असता, त्यांनी जय श्रीरामची घोषणा देऊन बगल दिली. तसेच पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडून देणारे भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष प्रदिप रामचंदानी यांनाही टेंडर घोटाळ्याच्या चौकशी प्रगती बाबत विचारले असता, त्यांनीही पत्रकारांना जय श्रीराम घोषणा देऊन मूळ प्रश्नाला बगल दिली. तीच परिस्थिती शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख अरुण अशान व संबंधित ठेकेदारांची आहे.
टेंडरवारचा आरोप-प्रत्यारोप करणाऱ्यात समझोता? महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी भाजप व शिंदे गटाच्या मागणीनुसार टेंडरवारची चौकशी केल्यास, मोठे माशे फसण्याची शक्यता व्यक्त होत होती. अखेर आपले कारनामे चव्हाट्यावर येवू नये म्हणून आरोप-प्रत्यारोप करणाऱ्यानी समझोता।केल्याचे।बोलले जात आहे.