लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे २०२१ चा दहावीचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. परंतु, अवघ्या अर्ध्या-पाऊण तासातच निकालाची वेबसाईट तांत्रिक कारणाने क्रश झाली. ती अगदी सायंकाळपर्यंत सुरू न झाल्याने विद्यार्थी, पालक आणि शाळांमध्ये अतिशय निरुत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
परीक्षा देऊन लागलेल्या निकालाचा आनंद घ्यायला यंदाच्या वर्षीचे विद्यार्थी तर मुकलेच, पण मूल्यांकनाच्या आधारे लागलेला निकाल पाहण्याच्या आनंदावरही शुक्रवारी विरजण पडले. अनेक शाळांमध्येही शिक्षक सायंकाळी उशिरापर्यंत वेबसाईट सुरू होण्याची वाट पाहत होते. मात्र, ती सुरू न झाल्याने अनेक शिक्षक, मुख्याध्यापकही नाराजीचा सूर उमटवत घऱी परतले.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे २०२१ चा दहावीचा ऑनलाईन निकाल शुक्रवारी दुपारी दीड वाजता जाहीर झाला. कोरोनामुळे यंदा पहिल्यांदाच परीक्षा न होता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार केला आहे. त्यामुळे परीक्षा न देताही विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता होतीच. शुक्रवारी निकाल लागल्यावर तासाभराच्या आधीच वेबसाईट क्रश झाली आणि विद्यार्थ्यांची चिंता अधिकच वाढली. घरोघरी, मोबाईलवर, तर ठाण्यातील अनेक शाळांत विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक मुलांचा निकाल बघण्यासाठी सकाळपासून हजर होते. दुपारनंतर अनेक प्रयत्न करूनही ती साईट काही सुरू झाली नाही. ठाणे जिल्ह्याचा निकाल चांगला लागलेला असल्याने नापास होणाऱ्यांचे प्रमाण कमी असणार हे खरे असले तरी, आपले गुण बघण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी उत्सुक होता. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत ही वेबसाईट सुरूच न झाल्याने कंटाळून शाळेतील शिक्षक, विद्यार्थी निरुत्साही होऊन घरी परतले.
----------------
आमच्यामागे कसले ग्रहण लागले कळतच नाही. कोरोनामुळे आधी शाळा नाही, मग परीक्षा नाही आणि आता जो निकाल लागला, तोही पाहायला मिळत नाही. निकालाची उत्सुकता संपत आलीय, असे मत काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
------------
जिल्ह्यात मीरा-भाईंदर मनपा क्षेत्र अव्वल
ठाणे जिल्ह्यातील १ लाख २४ हजार ९१ विद्यार्थी प्रवीष्ट झाले होते, त्यापैकी १ लाख २३ हजार २०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. ठाणे जिल्ह्यात मीरा-भाईंदर मनपा क्षेत्राचा निकाल सर्वाधिक ९९.७१ टक्के लागला आहे. त्याखालोखाल अंबरनाथचा निकाल ९९.६३ टक्के, ठाणे महानगरपालिका क्षेत्राचा निकाल ९९.६० टक्के, शहापूरचा ९९.४७ टक्के, नवी मुंबईचा निकाल ९९.४२ टक्के, मुरबाडचा ९९.३४ टक्के, कल्याण-डोंबिवलीचा ९९.२७ टक्के, भिवंडीचा ९९.२६ टक्के, उल्हासनगर मनपाचा ९९.२१ टक्के, कल्याण ग्रामीण तालुक्याचा ९९.१५ टक्के, तर सर्वात कमी भिवंडी मनपा क्षेत्राचा निकाल ९७.६१ टक्के इतका लागला आहे.