डोंबिवली - डोंबिवलीतील काही फेरीवाल्यांना रामनगर पोलीस ठाण्यात बोलावल्याने तणाव निर्माण झाला आहे. पोलीस ठाण्यात सुमारे 400 फेरीवाले एकत्र जमले आहेत. कारवाई करायची सगळ्यावर करा, अटक झाली तरी चालेल.
कुठेतरी पोटच भरायच ते जेलमध्ये भरू, निदान जेवायला तर मिळेलच ना? असा पवित्रा कष्टकरी फेरीवाला युनियनचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी घेतला आहे. पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग पवार, महापालिकेचे परशुराम कुमावत, युनियन पदाधिकारी यांची बैठक सुरू आहे.
महापालिका, मनसे आणि युवा सेना यांना न जुमानता फेरीवाले बसले अशा आशयाचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले होते. गुरुवारी नेमका तोच धागा पकडत अधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांना स्थानक परिसरात काय सुरू आहे असा सवाल केला. कुमावत याना कबळेंनी तात्काळ उत्तर दिले की मग बसू कुठे ते सांगा, धंदा करू द्या पोटाचा प्रश्न आहे. तेवढ्यात पोलिसांनी सगळ्यांना हटकवले, व पोलीस ठाणायत यायला सांगितले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. सगळे फेरीवाले पोलीस ठाण्यात जमा झाल्याचे कांबळे म्हणाले