अनिकेत घमंडी, डोंबिवली२०१५ च्या केडीएमसी निवडणुकीत १५ हून अधिक वर्षे युतीत असलेला मित्रपक्ष भाजपाची ताकद वाढणार असल्याने शिवसेनेवरील दबाव वाढला आहे. एकंदरीत वस्तुस्थिती बघता शिवसेना तुलनेने अधिक जागा मिळवण्याची शक्यता असली तरीही एवढी वर्षे भाजपाला नाममात्र ठेवण्यात आणि सत्तेतील टेकूची व्हॅल्यू असलेल्या मित्रपक्षाला जास्तीच्या जागा मिळाल्या तर... या चिंतेने शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची झोप उडाली आहे. त्यामुळेच ते नेते कल्याण-डोंबिवलीत तळ ठोकून आहेत.भाजपाच्या म्हणण्यानुसार त्यांना साधारणत: ४०-४५ जागांवर यश मिळणे अपेक्षित आहे. प्रत्यक्ष वस्तुस्थितीचा आढावा घेतल्यास एवढे यश मिळणार नसले तरीही तिशीच्या घरात त्यांना जागा मिळतील, असा अंदाज शिवसेनेनेही वर्तवला आहे. मात्र, ऐवीतेवी दहाच्या आत असलेला मित्रपक्ष वाढणार असल्याने त्याचा प्रभाव कसा कमी करता येईल, याची चिंता त्या पक्षाच्या नेत्यांना आहे. त्या दृष्टीने आता पुढील व्यूहरचना रचण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. भाजपानेही सावध पवित्रा घेऊन जागा वाढतील, असे सांगून नेमक्या किती याचा अंदाज आताच सांगता येत नसल्याचे स्पष्ट केले. शिवसेना नेत्यांच्या सांगण्यानुसार त्यांना डोंबिवलीत फटका बसणार असून कल्याणमध्ये ते एक नंबरवर असतील, असा दावा त्यांनी केला. कल्याण पूर्वसह पश्चिमेतील अवघ्या काही जागा सोडल्या तर तेथे भगवाच दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळेच त्यांचे नेतेही महापौर शिवसेनेचाच असेल, असे ठामपणे सांगत आहेत. तो कसा बसवावा, याच्या आकडेवारीची जुळवाजुळव सुरू असून पूर्ण बहुमत न मिळाल्यास कोणाची मदत घ्यावी, या दिशेने त्यांचे विचारचक्र सुरू आहे. ग्रामीणमध्येही त्यांना जागा मिळतील, असा विश्वास असल्याने तेथील इच्छुकांशीही ठाण्याच्या नेत्यांनी डोंबिवलीच्या मध्यवर्ती कार्यालयात पहाटे साडेचारपर्यंत हितगुज केले. त्यातही संघर्ष समितीची वाटचाल, त्यांची ताकद, त्यांना मिळालेला पाठिंबा आदींबाबतची चाचपणी करण्यात आली. तसेच तेथून शिवसेनेच्या वतीने उमेदवारी हवी असलेल्यांशी चर्चा करण्यात आली. अशा सर्व स्थितीत भाजपासोबत युती झाली नाही, तर मात्र पक्षाची पकड कशी असेल, या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. तसेच सत्तेचा वापर करून भाजपा दबावतंत्र वापरत असल्याची उघड टीकाही आता त्या नेत्यांनी सुरू केली आहे.
मित्रपक्षाची ताकद वाढण्याचे टेन्शन
By admin | Published: October 12, 2015 4:37 AM