कसारा : येथील बाजार पेठेतील सिद्धेश्वर मंदिर ट्रस्टच्या जागेत बुधवारी रात्रीच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना केल्याने कसाऱ्यात गुरुवारी सकाळपासून तणाव होता. अखेर महसूल व पोलीस प्रशासनाच्या आठ तासांच्या अथक परिश्रमानंतर हा वाद आटोक्यात येत तणावपूर्ण शांतता प्रस्तापित झाली.
कसारा येथे असलेल्या रोकडोबा, सिद्धेश्वर मंदिर देवस्थानच्या मांदिराच्या मागे मोकळी जागा आहे. या जागेत लोकोपयोगी योजनांचे बुधवारी सकाळी भूमिपूजन झाले. याच मोकळ्या जागेत रात्रीच्या सुमारास गौतम बुद्धांच्या पाच मूर्तींची स्थापना केली असल्याचे मंदिर व्यवस्थापनाच्या सकाळी लक्षात आल्यानंतर प्रशासनाने त्वरित कसारा पोलीस ठाण्यात धाव घेत सर्व प्रकारची माहिती दिली. या घटनेचे पडसाद गावभर उमटले. शिवसेनेसह सर्वच हिंदुत्ववादी संघटनांनी ‘कसारा बंद’ची हाक दिली. सर्व व्यपाऱ्यांनी बाजार बंद ठेवत दोषींवर कारवाई करावी व मंदिराच्या जागेवरील मूर्ती हटवण्याची मागणी केली.
कसारा गावातील तणावसदृश परिस्थिती वाढत असल्याने शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही समाजबंधवांची बैठक घेत मूर्ती सुरक्षितस्थळी हलवण्याबाबत चर्चा केली. त्यादरम्यान कसारा पोलीस ठाण्यात दोन तासांनी निर्णायक तोडगा निघाल्यानंतर मूर्ती काढण्यासाठी गेलेल्या प्रशासनास महिलांकडून विरोध करण्यात आला. त्यावेळी तहसीलदार सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी ढवळे, पोलीस अधिकारी दत्तू भोये, प्रताप भोस, सलमान खतीब, माजी आ. पांडुरंग बरोरा, आरपीआयचे देवीदास भोईर, शांताराम शेजवळ, भारिपचे अमर भरीत, रमाकांत पालवे यांनी यशस्वी मध्यस्थी करीत महिलांना शांत केले. वादग्रस्त जागेतील मूर्ती बुद्ध विहारात ठेवण्यात आल्या आहेत. त्यानंतर वातावरण शांत झाले.
मंदिरामागील मंदिर प्रशासनाच्या मोकळ्या जागेत जो काही प्रकार झाला तो चुकीचा आहे. मंदिराच्या जागेत तथागत बुद्धांच्या मूर्ती रात्री स्थापन करणे हा प्रकार दोन गटांत वाद होण्यासारखा आहे. पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घ्यावा व कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याऱ्यांवर कारवाई करावी.
- चंद्रकांत जाधव,
शिवसेना नेते
दोन्ही समाजांत गुण्यागोविंदाचे वातावरण असताना आम्हाला कुठलीही कल्पना नसताना तथागत बुद्धांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली. त्या कोणी स्थापन केल्या, त्याचा शोध पोलिसांनी घ्यावा व कारवाई करावी.
- देवीदास भोईर, अध्यक्ष, रिपाइं