लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरारोडच्या पूनम सागर कॉम्प्लेक्स जवळ एका मंदिराचे गाळे पालिकेने तोडले . त्यावरून लोकांनी जेसीबी अडवून ठेवत मंदिराची कारवाई माजी भाजपा आमदाराच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप केला व त्याच्याविरुद्ध घोषणाबाजी करत निषेध केला .
मीरारोडच्या पूनम सागर कॉम्प्लेक्स मध्ये स्वप्नदीप इमारतीच्या मागे श्री चतुरेश्वर महादेव मंदिर आणि नाकोडा मंदिर आहे . शुक्रवारी दुपार नंतर महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने जेसीबी ने महादेव मंदिराच्या लगत बांधलेले दोन गाळे तोडण्याची कारवाई केली . त्यावेळी मंदिराच्या बांधकामाचे नुकसान झाले . महापालिकेने अचानक येऊन कारवाई केल्या बद्दल मंदिराचे व्यवस्थापक सह लोकांनी कारवाईचा निषेध केला .
माजी भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या सांगण्या वरून पालिकेने मंदिर वर कारवाई केली असा आरोप करत लोकांनी त्यांच्या विरुद्ध घोषणाबाजी केली . अनेक वेळ पर्यंत लोकांनी मेहतांच्या नावाने घोषणा देत निषेध केला . पालिकेचा जेसीबी अडवून ठेवत घेराव घातला . पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ . संभाजी पानपट्टे आणि उपायुक्त रवी पवार हे आल्या नंतर के के तिवारी , प्रवीण राय आदींसह जमावाने संताप व्यक्त करत पालिकेने मंदिरावर आकसाने कारवाई केली असे सांगितले . सायंकाळी अधिकाऱ्यांनी लोकांची समजूत काढून मग जेसीबी नेण्यात आला .
धार्मिक तणाव वाढू नये म्हणून नया नांगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास सुपे हे घटनास्थळी पोलीस फाट्यासह दाखल झाले . दरम्यान पालिकेने महादेव मंदिर लगत असलेल्या नाकोडा मंदिराच्या अनधिकृत कार्यालयावर देखील तोडक कारवाई केली . तर येथील स्वप्नदीप सोसायटी सह अनेकांनी येथील दोन्ही मंदिराच्या बेकायदा बांधकामां बाबत पालिकेत तक्रारी केल्या होत्या असे पालिका सूत्रांनी सांगितले .
नरेंद्र मेहता म्हणाले कि , मी मुझफ्फर हुसेन यांचे वडील वारले म्हणून मीरारोड दफनभूमीत कडे तेथून जात होतो . माझी ह्या बांधकामाची तक्रार नव्हती व पालिका कारवाईशी काहीच संबंध नसताना माझ्यावर खोटे आरोप केले आहेत . मंदिराच्या जवळ गाळे बांधले होते व तक्रारी झाल्याने पालिकेने कारवाई केली असावी . अनधिकृत बांधकाम असेल तर कोणी तक्रार करायची नाही का ? . के के तिवारी ह्याने भाजपाच्या कार्यक्रमात घोषणाबाजी केली म्हणून त्याला पक्षातून काढून टाकले तसेच त्याच्यावर एका महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे व त्याचा राग तिवारी याला माझ्यावर असावा म्हणून माझी नाहक बदनामी केली आहे . मी पोलिसांना तक्रार केली आहे .
महादेव मंदिरचे ट्रस्टी के . के . तिवारी यांनी सांगितले कि , पूजाअर्चा साठी भाविकांना परिसरात बेल फुल , दूध , पाणी आदी मिळत नसल्याने मंदिराच्या भागातच त्याची सोय व्हावी म्हणून गाळा बांधला होता . मेहता हे आले होते व पालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून गेल्या नंतर पालिकेने मंदिरावर अचानक कारवाई सुरु केली . मात्र मंदिराचे बांधकाम तोडायला लावल्या वरून संतप्त भाविकांनी मेहतांच्या निषेधार्थ घोषणा दिल्याने ते जाणीवपूर्वक माझ्यावर आरोप करून दिशाभूल करत आहेत . मेहतांवर बलात्कार पासून असंख्य गुन्हे दाखल आहेत त्याचे काय ?