लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - भाईंदरच्या चौक येथील धारावी किल्ल्यावर महापालिकेने साजरा केलेला विजयोत्सवचा कार्यक्रम, नरवीर चिमाजी अप्पा यांचा अश्वारूढ पुतळा व किल्ल्याचा परिसर पाहून पहिल्यांदाच या ठिकाणी आलेले पेशव्यांचे दहावे वंशज पुष्करसिंह पेशवा आनंदित झाले . यावेळी त्यांनी पेशव्यांचा श्लोक म्हणत आपला आनंद व्यक्त केला .
वसईच्या किल्ल्यावर नजर ठेवण्यासह त्यांची समुद्र मार्गे येणारी रसद तोडणे व पोर्तुगीजांच्या ताब्यातून वसई किल्ला जिंकण्यासाठी खाडी पलीकडे भाईंदरच्या चौक डोंगरावरील धारावी किल्ला हाती येणे आवश्यक होते . धारावी किल्ला जिंकण्यासाठी मराठ्यांनी ८ वेळा प्रयत्न केला होता . नवव्या वेळी म्हणजेच ६ मार्च १७३९ रोजी धारावी किल्ला नरवीर चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांना पराभवाची धूळ चारून मराठा साम्राज्यात आणला होता . ६ मार्च हा विजय दिन म्हणून साजरा करण्याचा आग्रह गडप्रेमीं कडून होत होता . यंदा त्याला २८४ वर्ष झाली.
महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी हा विजय दिन महापालिके मार्फत साजरा करण्याचा निर्णय घेतला . त्या अनुषंगाने पालिकेने संपूर्ण किल्ल्यावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई व फुलांची सजावट केली होती. पुष्करसिंह पेशवा यांच्या हस्ते धारावी देवी मंदिरात आरती व दर्शनाने कार्यक्रमाची सुरवात केली गेली . चिमाजी अप्पा यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली . यावेळी पेशव्यांसह आयुक्त दिलीप ढोले , आमदार गीता जैन , शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या आई ज्योती व वडील प्रकाश, सहाय्यक पोलीस आयुक्त शांतीलाल जाधव, माजी उपमहापौर हसमुख गेहलोत आदी उपस्थित होते .
महापालिकेच्या काशी , माशाचा पाडा , मुर्धे , मोरवा व भाईंदर पश्चिम ह्या ५ शाळां मधील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशात चिमाजी अप्पा स्मारक पासून किल्ल्याच्या बुरुज पर्यंत मिरवणूक काढली . विद्यार्थ्यांनी लेझीमच्या तालात हि फेरी काढली . यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते . पुष्करसिंह यांनी सांगितले कि , आपण कोकणात अनेक ठिकाणी फिरलो मात्र इकडे कधी आलो नाही याचे मला आश्चर्य वाटते. चिमाजी अप्पा यांच्या स्मृतींचे इतके सुंदर जतन करत आला आहेत त्याचा आनंद वाटतो . त्यांनी पेशव्यांचा श्लोक म्हणून दाखवत तो श्रीवर्धनच्या लक्ष्मी नारायण मंदिर मागे लिहून ठेवला आहे व चिमाजी अप्पा त्याच मातीतले होते असे सांगितले .
धारावी किल्ल्याच्या संवर्धन आणि जतन साठी राज्य शासनाने १० कोटी तर महापालिकेने ३ कोटींची तरतूद केली आहे . महापालिकेने चिमाजी अप्पा यांचे स्मारक व उद्यान विकसित केले आहे . किल्ला परिसरचे ऐतिहासिक पावित्र्य जपत त्याचे महत्व नागरिकांना होण्यासाठी पालिका विविध उपक्रम व कामे करत असल्याचे आयुक्त ढोले यांनी सांगितले .
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"