ठाणे : लॉकडाऊनमुळे नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडे जोडप्यांचा कल वाढला असताना मंगळवारी १३/७ या अनोख्या तारखेला ठाणे जिल्ह्यातील २४ जोडपी नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध झाली. तर ११ जोडप्यांनी विवाहासाठी नोंदणी केली.
'१३/७ है तो मुझे क्या कमी है, १३/७ साथ हमेशा रहेगा' म्हणत ही २४ जोडपी विवाहबद्ध झाली. पहिल्या लॉकडाऊनमध्ये अनेक जोडप्यांनी आपले विवाह सोहळे पुढे ढकलले होते. त्यानंतर नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडे जोडप्यांचा कल वाढू लागला. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर ५० माणसांमध्ये विवाह सोहळा करण्याचे नियम लागू झाले. काही जोडपी या नियमांच्या चौकटीत राहून आपले विवाह सोहळे उरकून घेत आहेत तर काही जणांनी नोंदणी पद्धतीच्या विवाहाला पसंती दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊनपासून नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांची संख्या निश्चितच वाढली आहे. या महिन्यातील मंगळवारचा विवाह मुहूर्त हा शेवटचा असल्याने तसेच १३/७ (तेरा साथ) ही अनोखी तारीख आल्याने मंगळवारी सर्वाधिक जोडप्यांनी विवाह केला. या आठवड्यात या तारखेला सर्वाधिक जोडप्यांचा विवाह झाला असे विवाह अधिकारी अनिल यादव यांनी सांगितले. सोमवारी २१ जोडपी विवाहबद्ध झाली होती.
सोशल डिस्टन्सिंगमुळे एकावेळी एकाच जोडप्याला प्रवेश दिला जातो. एक जोडपे आणि त्यांच्यासोबत तीन साक्षीदारांना येण्याची परवानगी असल्याचे यादव म्हणाले. मंगळवारी पाऊस असतानाही सर्वाधिक जोडपी आजच्या तारखेला आली होती. सकाळी १० वाजल्यापासून जोडपी विवाहासाठी आली होती.
------------------------------
३ जुलैनंतर १३ जुलैचा मुहूर्त होता. या सिझनमधला हा शेवटचा मुहूर्त होता. चातुर्मासनंतर आता थेट २० नोव्हेंबरला मुहूर्त आहे.
- दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ