ठाणे : लॉकडाऊनच्या काळात आदिवासींना खावटीची रक्कम मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, केवळ कागदी घोडेच नाचविले जात असल्याचा आरोप करून श्रमजीवी संघटनेने याविरोधात येथील वागळे इस्टेट परिसरातील विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालये, प्रकल्प कार्यालयांबाहेर आदिवासी विभागाच्या प्रशासनाचे ‘तेरावे’ घालून आंदोलन केले. या आंदोलनास सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाल्याचे श्रमजीवीचे जनसंपर्क अधिकारी प्रमोद पवार यांनी सांगितले.
खावटी योजनेच्या धोरणाप्रमाणे भुकेचा काळ हा जून ते सप्टेंबर हा आहे. मात्र, सप्टेंबर महिना संपत आला तरीही खावटी योजनेचा लाभ आदिवासींना मिळालेला नाही. ठाणेसह रायगड, पालघर आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये आणि आयुक्त कार्यालयाच्या समोर प्रशासनाचे ‘तेरावे’ घालण्याचे अभिनव आंदोलन श्रमजीवीच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाने छेडले.