उल्हासनगर : महापालिका परिवहन समिती सभापती आणि सदस्यांचा कालावधी संपुष्टात आल्याने, आयुक्त अजीज शेख यांनी त्यांचा सत्कार करून निरोप दिला आहे. सभापती सुभाष तनवडे यांनी सभापती पदाच्या कालावधीत महापालिका परिवहन सेवा सुरू होण्याबाबत समाधान व्यक्त केले.
उल्हासनगर महापालिका निवडणूक न झाल्याने, महापालिकेवर प्रशासकीय राजवट सुरू झाली. आयुक्त अजीज शेख हे प्रशासन प्रमुख आहेत. दरम्यान तत्कालीन नगरसेवकांनी निवडून दिलेल्या सदस्यांमुळे परिवहन समिती आजपर्यंत अस्तित्वात होती. मात्र त्या सदस्यांचा कालावधी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात संपुष्टात येत आहे. त्यामुळे महापालिका परिवहन समिती आपोआप संपुष्टात येत आहे. महापालिका स्थायी समिती प्रमाणे परिवहन समितीमध्ये दरवर्षी निम्या सदस्यांचा कालावधी संपुष्टात येऊन नवीन सदस्यांची निवड केली जात असते. मात्र महापालिका निवडणूक न झाल्याने, नवीन सदस्यांची निवड झाली नाही. त्यामुळे उर्वरित सदस्य व सभापती सुभाष तनवडे यांचा कालावधी संपुष्टात आला आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी कालावधी संपुष्टात येत असलेल्या परिवहन समिती सभापती सुभाष तनवडे यांच्यासह अन्य सदस्यांचा सत्कार करण्यात आला. ११ वर्षांपूर्वी बंद झालेली महापालिका परिवहन सेवा सुरू होत असल्याबाबत सभापती सुभाष तनवडे यांनी समाधान व्यक्त करून महापालिकेच्या हितासाठी आम्ही कधीही तत्पर असल्याचे यावेळी सांगितले.