लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शरीररचनेत होणाऱ्या विषम बदलास तृतीयपंथी म्हणतात. तृतीयपंथी निसर्गाने नव्हे समाजाने निर्माण केला. तृतीयपंथीयांबद्दलची समाजमनातील विषम भावना मुळासकट नष्ट व्हायला हवी, असे प्रतिपादन एलजीबीटी समुदायाच्या मूलभूत हक्कांसाठी काम करणाऱ्या बिराजा यांनी शनिवारी केले.
सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील ‘बिईंग मी’ समिती कार्यरत आहे. बिईंग मीने आयोजित केलेल्या ‘अवेअरनेस अबाउट लाइफ ऑफ थर्ड जेंडर’ या कार्यक्रमात तृतीयपंथीयांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम स्वत:च्या घरी आयोजित करणाऱ्या पत्रकार प्रज्ञा म्हात्रे यांच्याशी सुसंवाद साधल्याने आम्हाला निश्चित दिशा मिळाल्याचे ‘बिईंग मी’ च्या समन्वयक व उपप्राचार्य डॉ. मृणाल बकाणे यांनी सांगितले. उपप्राचार्य डॉ. संज्योक्त देऊस्कर यांनी बिईंग मी समितीची आजवरची वाटचाल व भविष्यातील कार्यक्रमांबद्दल सविस्तर माहिती दिली. या आभासी मंचावरील कार्यक्रमात ऑक्सफाम इंडिया या स्वयंसेवी संस्थेत प्रचारक म्हणून काम करणाऱ्या अक्षय तरफे व बिराजा यांनी समाजाकडून एलजीबीटी समुदायाच्या काय अपेक्षा आहेत, त्यासंदर्भात आपले मत मांडले.
आपल्या सादरीकरणात तरफे यांनी केरळसह काही राज्यांतील तृतीयपंथीयांवर होणारा अन्याय, सुखी जीवनासाठी आवश्यक शिक्षण व रोजगार या क्षेत्रात त्यांची होणारी उपेक्षा प्रखरतेने मांडली. सार्वजनिक ठिकाणी तृतीयपंथीयांसाठी प्रसाधनगृहे नाहीत, शासकीय कार्यालयांमधील विविध अर्ज तसेच, शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेश अर्जांवर लिंगविषयक रकान्यामध्ये त्यांना स्थान नाही, हे अत्यंत खेदजनक आहे, अशा शब्दांत तरफे यांनी नाराजी व्यक्त केली. एक माणूस म्हणून आम्हालाही सर्वसामान्यांसारखी वागणूक का मिळू नये? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बिराजा म्हणाल्या की, सर्व तृतीयपंथी हे सर्वसामान्य नागरिकच असून, आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान कार्ड, इतर आवश्यक कागदपत्रे व आवश्यक मूलभूत सुविधा त्यांना मिळणे एक माणूस म्हणून त्यांचाही अधिकार आहे.
कार्यक्रमाला ज्ञानसाधना ठाणे, संस्थेचे सचिव कमलेश प्रधान, सहसचिव मानसी प्रधान, प्राचार्य डॉ. हेमंत चित्ते यांचे मार्गदर्शन लाभले.
...........
वाचली