सदानंद नाईक
उल्हासनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुकानदारांनी कोरोना टेस्ट करा. अन्यथा दुकानें बंद ठेवा. असा फतवा महापालिकेने काढल्याने दुकानदारात असंतोष निर्माण झाला. तर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दुकानदारांनी अँन्टीजेन चाचणी करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया जनसंपर्क अधिकारी युवराज भदाने यांनी पत्रकारांना दिली आहे.
उल्हासनगरात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित आहे. त्याचे फलित म्हणजे कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्के पेक्षा जास्त आहे. दरम्यान दुकानदार व हॉटेल चालकांचा असंख्य नागरिकांशी संपर्क होत असल्याने, त्यांची अँन्टीजेन टेस्ट करण्याचा निर्णय महापालिकेने मध्यंतरी घेतला. मात्र दुकानदार अँन्टीजेन चाचणी करण्यास पुढे येत नसल्याने, महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोंडी झाली. दोन दिवसापूर्वी कॅम्प नं-३ व ५ परिसरातील दुकानदारांनी कोरोना टेस्ट करा. त्यानंतर दुकानें सुरू ठेवा. असे महापालिका अधिकारी व कर्मचारी सांगत एक अर्ज दुकानदारांना दिल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकाराने संतप्त झालेल्या दुकानदारांनी व्यापारी संघाचे अध्यक्ष व महापालिका विरोधी पक्षनेते किशोर वानावारी, स्थानिक नगरसेवक सतरामदास जेसवाणी यांच्याकडे धाव घेवून नाराजी व्यक्त केली.
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व विरोधी पक्षनेते किशोर वनवारी यांनी महापालिका आयुक्तांना सदर प्रकार सांगणार असल्याची प्रतिक्रिया दिली. नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही असाच निर्णय घेतल्यावर व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. अखेर सक्तीने कोरोना टेस्ट घेण्याचा निर्णय मागे घेतल्याचे वनवारी म्हणाले. सक्तीने टेस्ट घेतल्यास व्यापारी वर्ग विरोध करण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. कोरोना महामारी व लॉकडाऊन मुळे व्यापारी यांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांनी व्यापार बंद केला. अनलॉक मुळे व्यापार रुळावर येत असताना कोरोना व अँन्टीजेन टेस्ट शक्तीचे केल्यास व्यापारी मध्ये असंतोष निर्माण होणार असल्याची प्रतिक्रिया अनेक व्यापाऱ्यांनी दिली आहे.
अँन्टीजेन टेस्ट देणे काळाची गरज - भदाने
शहरात कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी महापालिकेने नागरिकांचा मोठ्या प्रमाणात संपर्क येत असलेल्या दुकानदारांची अँन्टीजेन टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला. शासनाचाही तसा निर्णय असून दुकानदारांनी नागरिक व शहरहितासाठी अँन्टीजेन टेस्ट करा. अशी प्रतिक्रिया महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाने यांनी पत्रकारांना दिली आहे. कॅम्प नं-४ परिसरातील एका हॉटेल मालकाचा सिलेंडरचा स्फोट झाल्याने मृत्यू होऊन १० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते.