ठाणे: ठाणे महापालिका हद्दीत सध्या दररोज सध्या 1300 पर्यंत टेस्ट होत असून ही संख्या 3 हजारांपर्यंत वाढवण्यात येईल अशी माहिती पालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी दिली आहे.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ठाणे महापालिकेत घेऊन कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर शर्मा यांनी ही माहिती दिली आहे.कोरोना रोखण्यासाठी मुंबईत जी पाऊले उचलण्यात आली ताशाप्रकारची पाउले ठाण्यात देखील उचलण्यासाठी पर्यावरण मंत्र्यांनी संमती दर्शवली असून त्या दृष्टीने लवकरच पाउले उचलण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी दुपारी अचानक ठाणे महापालिकेत येऊन ठाण्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यामध्ये ठाणे महापालकेच्या हद्दीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय उपाय योजना करण्यात येत आहे याचे सादरीकरण डॉ शर्मा यांनी पर्यावरण मंत्र्यांसमोर केले. यामध्ये टेस्टिंगचे प्रमाण वाढवण्याच्या बरोबरच संपर्कातील कमीत कमी 20 च्या ऐवजी 28 जणांचा शोध घेऊन त्यांना क्वारेटाईन करणे, हाय रिस्क आणि लो रिस्कच्या नागरिकांचे वर्गीकरण करणे अशा अनेक उपाय योजना करण्यात येत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.
पूर्वी जो लॉकडाउन करण्यात आला होता आणि आताच्या लॉकडाउनमध्ये फरक असून केंद्र आणि राज्य शासनाच्या नियमाला अनुसरून लॉकडाउन करण्यात आला असून नागरिकांचा देखील प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
ऑटोमॅटिक बेड मॅनेजमेंटचे लवकरच उदघाटन
ठाण्यात रुग्णांना वेळेत उपचार मिळावे यासाठी लवकरच ऑटोमॅटिक बेड मॅनेजमेंट अपचे उदघाटन करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे.त्याचप्रमाणे ऑटोमॅटिक अबुलन्स मॅनेजमेंट अपचे देखील उदघाटन करण्यात येणार असून यासंदर्भात पर्यावरण मंत्री आणि पालकमंत्री यांच्याशी चर्चा झाली असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.