डोंबिवली : अनेक वर्षे बंद असलेले सूतिकागृहाचे तातडीने नूतनीकरण करून ते नागरिकांच्या सेवेसाठी खुले करावेत या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ डोंबिवली शहर कमिटीच्या वतीने बुधवारी केडीएमसीच्या येथील विभागीय कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. यावेळी इंदिरा चौकात ठिय्याही देण्यात आला होता. सूतिकागृहाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याची मागणीही भारिपने केली. नूतनीकरणासंदर्भात ‘ग’ प्रभागक्षेत्र अधिकारी प्रशांत जगताप यांना यावेळी निवेदन देण्यात आले.
४२ वर्षे जुने असलेल्या सूतिकागृहाचे २०१३ मध्ये छताला असलेले प्लास्टर कोसळले होते. तेव्हापासून सूतिकागृह बंद करण्यात आले आहे. ते अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. येथील पूर्वेतील टिळक रोडवरअसलेल्या सूतिकागृहातील कारभार डोंबिवली पश्चिमेकडील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात हलवण्यात आला आहे. येथे गर्भवतींच्या बाळंतपणाची सुविधा तर लसीकरणाची सुविधा पूर्वेकडील पंचायत बावडीनजीक असलेल्या नागरी आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे. स्थलांतरामुळे गर्भवती महिलांची परवड होत आहे. सूतिकागृहाच्या वास्तूचे नूतनीकरण तातडीने होणे आवश्यक होते. प्रशासनाच्या या उदासीन कारभाराचा निषेध करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. याआधी इंदिरा चौकात ठिय्या आंदोलनही करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या चालढकल प्रवृत्तीवर नाराजी व्यक्त करताना भारिपच्या कार्यकर्त्यांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. साळवे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी ‘ग’ प्रभागाचे अधिकारी चंद्रकांत जगताप यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. यावेळी झालेल्या चर्चेत जगताप यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत, असे साळवे यांनी सांगितले. तर जगताप यांनी भारिपचे संबंधित निवेदन आयुक्तांना पाठवणार असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, याआधीही ३१ आॅगस्टला भारिपतर्फे निदर्शने करण्यात आली होती.गर्भवतींची होतेय हेळसांडसूतिकागृहासारखे रुग्णालय गोरगरीब रुग्णांसाठी उपयुक्त होते. ते पाच ते सहा वर्षे बंद असल्याने गरिबांनी जायचे कुठे? डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल होण्यासाठी आलेल्या गर्भवतींना ऐनवेळी खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे लवकरात लवकर सूतिकागृहाचे नूतनीकरण झाले पाहिजे, अन्यथा पुढल्या वेळेस उपोषण केले जाईल, असा इशारा भारिपचे जिल्हा संघटक मिलिंद साळवे यांनी दिला.