ठाणे – महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या २ दिवसांपूर्वी एक राजकीय भूकंप घडला. ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला. अजित पवारांसह ८ राष्ट्रवादी आमदारांनी थेट सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली. या प्रकारावर राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमासारखा दिगू टिपणीस झाल्याची प्रतिक्रिया दिली. राज्याच्या राजकारणात वारंवार होणाऱ्या उलथापालथी पाहता आता कार्यकर्तेही त्यांच्या मनातील भावना व्यक्त करत आहेत.
सोमवारी दादरच्या शिवसेना भवनासमोर एका कार्यकर्त्याने बॅनर लावून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांना एकत्र येण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय. आता तरी एकत्र या असं या पोस्टरमध्ये कार्यकर्ता लक्ष्मण पाटील यांनी लिहिले होते. मुंबईनंतर आता ठाण्यात ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आहे. या बॅनरवर महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक यांनी एकच सूर आवळत राज आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
ठाणे शहरामध्ये उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र यावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक यांच्या वतीने “साहेब आता तरी एकत्र या” अशा आशयाचा बॅनर लावला आहे. महाराष्ट्राला तुमची खूप गरज आहे, बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हीच वेळ आहे. आम्हाला महाराष्ट्रात फक्त ठाकरे सरकार हवा आहे असा आशय असलेले बॅनर शहरांमध्ये तीन पेट्रोल पंपाठिकाणी लावण्यात आलेले आहेत.
मनसे नेत्याचे सूचक विधान
जनभावनेचा सन्मान केलाच पाहिजे. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे. युती होईल का नाही हे दोन्ही बाजूने ठरवले पाहिजे. राजकीय गणित कशी जुळवावी लागतात. भविष्यात काय होईल सांगता येत नाही. ठाकरे बंधु एकत्र येतील का हे काळच ठरवेल. जनता व्यक्त होत असते. पुढे काय होईल हे आगामी काळात कळेल असं सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मनसे-उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर सूचक विधान केले आहे.