लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणप्रकरणी आता उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. मारहाण झालेल्या रोशनी शिंदे यांची तक्रार अद्याप नोंदवून घेण्यात आलेली नसल्याने ठाकरे गटाकडून बुधवारी दुपारी ३ वाजता ठाणे पोलिस आयुक्तालयाला टाळे ठोको मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
आ. आदित्य ठाकरे या मोर्चाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती खा. विनायक राऊत यांनी दिली. रोशनी शिंदे मारहाणप्रकरणी राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. दुपारी तीन वाजता ठाण्यातील शिवाजी मैदानातून मोर्चाला सुरुवात होणार असून ठाणे पोलिस आयुक्तालयावर तो धडकणार आहे, अशी माहिती राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण, खा. राजन विचारे सहभागी होतील, अशी माहितीही त्यांनी दिली.