ठाणे : शहरातील वेगवेगळ्या भागांतील अनधिकृत बांधकामे पाडण्यासाठी आलेल्या ठाणे महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांना स्थानिकांनी धमकी दिल्याचा प्रकार दुसरी राबोडी आणि कळवा उड्डाणपुलाजवळील झोपडपट्टी भागात घडला. या प्रकरणी राबोडी आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राबोडीतील क्रांतीनगर, गल्ली क्रमांक ११ मधील ताहीर बंग व याकुब बंग यांनी त्यांच्या ५९४ आणि ५९५ क्रमांकांच्या या घरांमध्ये लोखंडी अँगलच्या साहाय्याने सिमेंट विटांचे विनापरवाना बांधकाम केले होते. त्या ठिकाणचे बांधकाम पाडण्याचे काम १९ नोव्हेंबरला दु. ४.३० वाजण्याच्या सुमारास चालू असताना एका अनोळखीने पालिकेच्या या कर्मचाऱ्यांना धमकावले. ‘तुमच्यामुळे माझ्या नातेवाइकाला अॅटॅक आला आहे. त्याला काही झाले तर तुम्हाला सोडणार नाही,’ असे सांगून निष्कासनाची कारवाई थांबविण्यास कर्मचाऱ्यांना भाग पाडले. ठाणे महापालिका प्रशासनाच्या वतीने या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलाजवळील महागिरी येथील राजेश धारू यांचेही तळ अधिक एक मजल्याचे बांधकाम तोडण्यासाठी दु. ३.३० वाजता पालिकेचे कर्मचारी गेले असता तिथेही धारू यांनी ‘तुम्ही बांधकाम कसे तोडता, ते बघतोच’, अशी धमकी दिली. या प्रकरणीही पालिकेने ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
ठामपा कर्मचाऱ्यांना दिली धमकी
By admin | Published: November 21, 2015 2:55 AM