ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा आणि शेवटी मनसेकडूनही शिवसेनेवर जोरदार टीका झाली आहे. त्यामुळे झालेल्या या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी शुक्रवारी ठाण्यात उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. मात्र, सभेच्या ठिकाणावरून गुरुवारी दिवसभर गोंधळ सुरू होता. सुरुवातीला ती मनोरुग्णालयाजवळ घेण्याचे निश्चित झाले होते. परंतु, त्यानंतर ती सिध्देश्वर तलावाजवळील एका बाजूचा रस्त्यावर ही सभा घेण्याचे निश्चित झाले. परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतर सायंकाळपर्यंत जागानिश्चितीबाबत गोंधळ सुरूच होता. अखेर मासुंदा तलावा जवळील सेंट जॉन दी बापटीस्ट हायस्कुल जवळील एक रस्ता आता या सभेसाठी देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात आला असून २५ वर्षे सत्तेत एकत्र असलेले मित्र आता एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. त्यामुळे या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या वेळी त्यांनी आपल्या भाषणातून शिवसेनेवर चौफेर हल्ला चढवला होता. अगदी मागील २५ वर्षांत शिवसेनेने ठाण्याचा कोणताही विकास केलेला नसून शहर बकाल केल्याची टीका त्यांनी केली होती. यात त्यांनी क्लस्टर डेव्हलपमेंट मलनि:सारण प्रकल्प, सांडपाण्याची व्यवस्था ते सेनेतील गुंडगिरी आधींचा खरपूस समाचार घेतला. त्यांच्या टीकेतून अगदी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही सुटले नाहीत. त्याच वेळी ठाण्यात मागील काही महिन्यांत ज्या सुधारणा झाल्या आहेत, त्या आपण आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या माध्यमातून केल्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत. त्यांच्या भाषणात टीकेचे प्रमुख लक्ष्य हे येथील स्थानिक शिवसेना आणि तिचा कारभार हेच होते. परिणामी, आता शिवसेनेकडून उद्धव ठाकरे त्याचे काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सुरुवातीला त्यांची सभा ही मनोरुग्णालयाजवळील मैदानात घेण्याचे निश्चित झाले होते. परंतु, हे मैदान सभेसाठी छोटे होईल, असा कयास लावण्यात आला. त्यानंतर, ती सभा सिद्धेश्वर तलावाजवळील रस्त्यावर घेण्याचे निश्चित झाले. सांयकाळी पाच पर्यंत येथे गोंधळ सुरु होता. परंतु येथे वाहतुक कोंडी होऊ शकते असे कारण वाहतुक पोलिसांकडून देण्यात आल्या नंतर पुन्हा ही जागा हलविण्यात आली. त्यानंतर मासुंदा तलावाजवळी सेंट जॉन दि बापटीस्ट हायस्कुल जवळील एक रस्ता आता या सभेसाठी मोकळा करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
ठाण्यात येणार भगवे वादळ
By admin | Published: February 17, 2017 1:56 AM