ठाणे - ठाणे महापालिकेच्या वतीने पीपीपी तत्वावर उपवन येथे फुटबॉल मैदान विकसित केले जाणार आहे. परंतु ज्या करदात्यांच्या पैशातून हे मैदान विकसित केले जाणार आहे. त्यांच्यासाठीच दुपारी १२ ते ४ या चुकीच्या वेळेत हे मैदान उपलब्ध असणार आहे. त्यामुळे हा ठाणेकरांवर अन्याय असून यात बदल करण्याची मागणी करीत भाजपाच्या नगरसेवकांनी या संदर्भातील सुधारीत प्रस्ताव पटलावर आणण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेवर अखेर हा प्रस्ताव तहकुब करण्याची वेळ आली. ठाणे महापालिकेच्या हद्दीत क्रिकेट, अॅथलेटीक्स, टेबल टेनिस, बॅडमिटंन, रायफल शुटींग, स्केटींग आदीकरीता अद्यावत क्रिडा संकुले महापालिकेने उपलब्ध करुन दिली आहेत. फुटबॉल हा खेळ जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा खेळ ओळखला जातो. दिवसेंदिवस फुटबॉलच्या खेळासाठी मैदानाची मागणी नागरीकांकडून व पदाधिकाऱ्यांकडून केली जात आहे. त्या अनुषगांने ठाणे महापालिकेने फुटबॉल खेळासाठी अत्याधुनिक पध्दतीचे मैदान विकसित करण्याचे निश्चित केले आहे. गावंडबाग येथील मैदान हे आॅलंपिक आकाराचे आहे. या मैदानात फुटबॉलकरीता आॅलंपिक दर्जाचे टर्फ उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्यामुळे ठाण्यातूनही आतंरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल खेळाडू तयार होऊ शकतात असा विश्वास ठाणे महापालिकेला वाटत आहे. त्यानुसार ६ हजार चौ. फुटावर हे टर्फ आंथरले जाणार आहे. पीपीपी तत्वावर २० वर्षांच्या कालावधीसाठी ८०-२० टक्केवारीत हे मैदान विकसित केले जाणार असून खाजगी संस्थेत चालविण्यासाठी दिले जाणार आहे. त्यानुसार फुटबॉलसाठी ११,२४७.३४१ चौ. मीटरचे मैदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. खाजगी संस्थेकडून आर्टीफीशीअल टर्फ उपलब्ध खेळाच्या जागेत विविध खेळांकरीता बसविण्यात येणार असून छोट्या मुलांसाठी प्ले पार्क आणि जनरल जिम, खेळांच्या मैदानाभोवती चालण्यासाठी वॉकींग ट्रॅक, बास्केटबॉल कोर्ट, क्रिकेटच्या नेट सरावाकरीता नेट उपलब्ध करुन देणे, फुड कोर्ट, स्पर्धा पाहण्यासाठी बैठक व्यवस्था, ठाणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या सर्व स्पर्धा व इतर स्पर्धा घेणे, खेळाडूंना मोफत बॉल, बिब्सचा पुरवठा करणे आदी सुविधा संबधींत संस्थेला कराव्या लागणार आहेत. दरम्यान शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. परंतु करदात्या ठाणेकरांना दररोज दुपारी १२ ते ४ या वेळेतच हे मैदान उपलब्ध करून दिले जाणार असून उर्वरित वेळेस मात्र संस्थेमार्फत हे मैदान भाड्याने दिले जाणार आहे. भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील आणि दिपा गावंड या दोन्ही नगरसेवकांनी नेमका हाच मुद्दा उपस्थित करत प्रशासनाच्या कारभारावर टिका केली. करदात्या ठाणेकरांना चुकीच्या वेळेत हे मैदान उपलब्ध होणार असेल तर महापालिकेनेच हे मैदान विकसित करावे अशी मागणी त्यांनी लावून धरली. त्यापाठोपाठ भाजपचे अन्य नगरसेवकही या मुद्द्यावरून आक्र मक झाले आणि हा प्रस्ताव तहकुब करण्याची मागणी केली. तर शहरातील खेळाडूंना फुटबॉलचे मैदान उपलब्ध होणार असल्याचा दावा करत शिवसेनेचे नगरसेवक मात्र या प्रस्तावासाठी आग्रही होते. अखेर फुटबॉल मैदानाचा सुधारीत प्रस्ताव पुढील सर्वसाधारण सभेत सादर करण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले.
ठाण्यातील फुटबॉल टर्फचा प्रस्ताव शिवसेनेला तहकुब करण्यासाठी भाग पाडले भाजपाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 4:00 PM
एका शिवसेना आमदाराच्या आग्रहाखातर आणलेला फुटबॉल टर्फचा प्रस्ताव अखेर भाजपाच्या नगरसेवकांनी तहकुब करण्याची वेळ शिवसेनेवर आणली. त्यानुसार पुढील महासभेत या संदर्भातील सुधारीत प्रस्ताव पटलावर ठेवण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले.
ठळक मुद्देकरदात्या ठाणेकरांनाच चुकीच्या वेळेस मैदान उपलब्धमहापालिकेनेच मैदान विकसित करण्याची भाजपाची मागणी