- प्रज्ञा म्हात्रेठाणे - गरमागरम मक्याची भाजलेली कणसं, वाफाळलेला चहा, दिग्गज मंडळी तसेच अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांच्या अनुभवासह ठाण्यात पुन्हा एकदा ‘गच्चीवरच्या गप्पा’ रंगणार आहेत. तीन वर्षांच्या ब्रेकनंतर या उपक्रमाला नवसंजीवनी मिळत असून ठाणेकरांच्या आग्रहाखातर नव्या जोमाने हा उपक्रम सुरू होत आहे. पावसाळ्याचा मुहूर्त गच्चीवरच्या गप्पांसाठी साधला आहे. या उपक्रमाचे पहिले पुष्प आॅगस्ट महिन्यात गुंफले जाणार आहे.सोशल मीडियाचे जाळे पसरल्यामुळे आजकाल प्रत्यक्षात भेटणे कमी झाले आहे. कट्ट्याकट्ट्यांवर बसून रंगणाºया गप्पाटप्पा या आता सोशल मीडियातच गुरफटल्या गेल्या आहेत. त्यामुळे कट्ट्यावर बसून सायंकाळी रंगणाºया कट्ट्यावरच्या गप्पा या लुप्त होत चालल्या आहेत. या गप्पांना नवसंजीवनी मिळावी, प्रत्यक्षात एकमेकांमधला संवाद वाढावा, यासाठी ज्येष्ठ चित्रकार सदाशिव कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ‘गच्चीवरच्या गप्पा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. प्रत्येकाकडे ज्ञानाचे भांडार असते. परंतु, सोशल मीडियाच्या दुनियेत प्रत्यक्षात भेटण्यापेक्षा चॅटिंगच्या माध्यमातून संवाद करणे नेटकरी पसंत करतात. त्यामुळे प्रत्यक्ष होणारी भेट ही सोशल मीडियाच्या वर्तुळात अडकली. हे सर्व लक्षात घेऊन आपल्या मनातील भावना एकमेकांसोबत व्यक्त करण्यासाठी कुलकर्णी यांनी नवे व्यासपीठ तयार केले. मनात राहिलेले विषय हे बोलायचे राहून जातात. या विषयांना गप्पांच्या माध्यमातून दिशा मिळावी, म्हणूनच या उपक्रमाची निर्मिती करण्यात आली. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू झाला. पहिल्या कार्यक्रमाची सुरुवात गरमागरम भजी आणि वाफाळलेल्या चहाने झाली. सुरुवातीला काहीही बोलावे, अशा स्वरूपाचा हा उपक्रम होता. पाच वर्षांपूर्वी कुलकर्णी यांच्या भास्कर कॉलनी येथील लक्ष्मीनारायण सोसायटीच्या गच्चीवर उपक्रमाचा पहिला कार्यक्रम झाला. महिन्यातून एकदा हा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यामुळे पहिल्या वर्षी १२ कार्यक्रम झाल्यानंतर आर्थिक अडचणींमुळे या उपक्रमाने पॉझ घेतला. त्यानंतर, दीड वर्षाने पुन्हा हा उपक्रम सुरू झाला आणि पुन्हा एकदा या उपक्रमात खंड पडला. दरम्यानच्या काळात ज्येष्ठ चित्रकार डॉ. सुहास बहुलकर, अभिनेत्री संपदा जोगळेकर, चित्रकार विजयराज बोधनकर, ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक, रागिणी सामंत, शिरीष मिठबावकर अशा अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावून गच्चीवरच्या गप्पा रंगवल्या. तीन वर्षांच्या ब्रेकनंतर हा उपक्रम ठाणेकर रसिकांच्या आग्रहाखातर पुन्हा सुरू होत आहे. उपक्रमाचा पहिला कार्यक्रम अभिनेते शरद पोंक्षे यांच्या उपस्थितीत आॅगस्ट महिन्यात टाउन हॉल किंवा ब्राह्मण सेवा संघ या ठिकाणी घेतला जाणार आहे. यंदाच्या या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे वैजयंती आपटे, तेजश्री प्रधान, मुक्ता बर्वे, शीतल क्षीरसागर यासारख्या अनेक मातब्बर मंडळींचे अनुभव ऐकायला तर मिळतीलच. परंतु, कॅन्टीनवाला, महापालिकेचा कर्मचारी, अतुलनीय कामगिरी केलेल्या ठाणेकरांचीदेखील मुलाखत रसिकांना ऐकायला मिळणार आहे.व्हॉट्सअॅपवरून हा गप्पाटप्पांचा ग्रुप तयार झाला आणि या उपक्रमाच्या निमित्ताने ही मंडळी प्रत्यक्षात भेटली.नाट्य परिषदेचे पदाधिकारीदेखील या गप्पांमध्ये सहभागी होणार आहेत.‘तंबुतला सिनेमा’ करणारे रीमा अमरापूरकर व नीता देवलकर हे सिनेमाचे अनुभवकथन करतील.
ठाण्यात पुन्हा रंगणार ‘गच्चीवरच्या गप्पा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 3:46 AM