ठाणे - ठाण्यातील एका मोठ्या वाहन उद्योजकाच्या नावे बँकेला फोन करून उद्योजकाच्या खात्यातील १३ लाख ५५ हजार रुपये स्वत:च्या खात्यात वळते करणा-या एका ठकसेनाविरुद्ध कासारवडवली पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला.ठाण्यातील मोदी ह्युंदाईचे मालक गौतम मोदी यांचे घोडबंदर रोडवरील बेसीन कॅथलिक बँकेच्या वाघबीळ शाखेमध्ये खाते आहे. या बँक खात्याचे व्यवहार मोठे आणि नियमित असल्याने शाखा व्यवस्थापक जॉन मॅथ्यू लोपीस यांना हे खाते चांगलेच परिचित होते. आपल्या खात्यातील बहुतांश व्यवहार मोदी ई-मेलद्वारे करायचे. कुणाच्याही खात्यात पैसे वळते करायचे असतील अथवा अन्य कोणताही व्यवहार असल्यास मोदी त्यांच्या ई-मेलवरून बँकेला मेल पाठवायचे. त्यानंतर, बँकेकडून त्यांनी सूचना केल्याप्रमाणे व्यवहार पूर्ण केला जायचा. मोदी स्वत: जातीने बँकेत क्वचित यायचे. मंगळवारी शाखा व्यवस्थापक लोपीस यांच्या मोबाइल फोनवर आरोपीने कॉल केला. आपण गौतम मोदी बोलत असल्याचे सांगून आरोपीने दोन खात्यांमध्ये आठ लाख ५५ हजार रुपये आणि पाच लाख रुपये वळते करण्यास सांगितले.या व्यवहारासाठी थोड्याच वेळात त्याने मोदी यांच्या ज्या खात्यातून पैसे वळते करायचे, तो खाते क्रमांक आणि मोदी यांच्या धनादेशाचा क्रमांकही लोपीस यांच्या मोबाइल फोनवर पाठवला. त्यामुळे शाखा व्यवस्थापकाला अजिबात संशय आला नाही. त्यांनी आरोपीने दिलेल्या बँक खात्यांमध्ये १३ लाख ५५ हजार रुपये वळते केले.व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आपल्याशी संपर्क साधलेली व्यक्ती खुद्द मोदी नसल्याचे उघड झाले. लोपीस यांनी बुधवारी कासारवडवली पोलिसांकडे तक्रार दिली. अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या खात्यांमध्ये १३ लाख ५५ हजार रुपये वळते करण्यात आले.कार्यालयातील कर्मचाºयाचा सहभाग?हे खाते दिल्लीतील बँकेमधील असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस.पी. पवार यांनी दिली. मोदी यांचा खाते क्रमांक आणि धनादेशांचा तपशील आरोपीला कसा मिळाला, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मोदी यांच्या कार्यालयातील कर्मचारी यामध्ये सहभागी आहेत का, याचाही तपास केला जाईल, असे पवार यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या फसवणुकीचे प्रकार वाढल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दिल्लीतील ठकसेनाने मोदींच्या खात्यातून काढले १३.५५ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 6:31 AM