डोंबिवली - पूर्व-पश्चिमेला जोडणारा कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपूल धोकादायक बनल्याने स्कूलबसची वाहतूक ठाकुर्ली पुलावरून वळवावी, अशी मागणी काही पालकांनी केली होती. वाहतूक विभागाने त्याची दखल घेत सर्व शाळांना पत्र पाठवून अवजड वाहनांची विशेषत: स्कूलबसची वाहतूक या पुलावरून करू नये, असे सुचवले आहे. यामुळे काही शाळांनी वाहतूक ठाकुर्ली पूलाकडून वळवण्याचा निर्णय घेतला आहे. तर, काही शाळांनी त्यास नकार दिला आहे.‘स्कूलबसची वाहतूक ठाकुर्ली पुलावरून वळवा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये २६ जूनला वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर, वाहतूक विभागाने सर्व शाळांशी पत्रव्यवहार करून हा पूल अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी तत्काळ बंद करावा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शाळांनी या पुलाला पर्याय असलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलावरून बस नेण्याचे ठरवले आहे. त्याबाबत विद्यार्थी आणि पालकांना माहिती देण्यास सांगितले आहे.ओमकार इंटरनॅशनल स्कूलच्या पालकांनी वाहतूक ठाकुर्ली पुलावरून वळवावी, अशी मागणी प्रथम केली होती. त्यानुसार, शाळेने गुरुवारपासूनच वाहतूक ठाकुर्ली पुलावरून वळवली आहे, असे शाळेच्या केंब्रिज विभागाच्या मुख्याध्यापिका अनुजा नाईक यांनी सांगितले.सिस्टर निवेदिता शाळेच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले की, आम्हाला वाहतूक विभागाचे पत्र मिळाले आहे. यंदाच्या वर्षी बसचा रूट ठरवतानाच आम्ही ठाकुर्ली पुलाचा अधिक वापर कसा होईल, याचा विचार केला होता. आता फक्त दोन बस आमच्या कोपर पुलाकडून जात आहेत. परंतु, या निर्णयामुळे ठाकुर्ली पुलाकडे कोंडी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही छोट्या व्हॅनचा उपयोग करू किंवा पालकांना पूर्वेच्या बाजूला येण्याचे आवाहन करू. मात्र, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.वाहतूक वळवणार नाहीअभिनव विद्यालयाचे सुशील सोनी म्हणाले, आम्ही शाळा सुरू झाली, त्यावेळी ठाकुर्ली पुलाचा वापर केला होता. मात्र, हा पूल लहान असल्याने मोठ्या बससाठी अडचणींचा ठरतो. शिवाय, ‘यू’ टर्न धोकादायक आहे. त्यामुळे आम्ही वाहतूक वळवणार नाही.अपघाताची भीतीविद्यानिकेतन शाळेचे संचालक विवेक पंडित म्हणाले, आमचा वाहतूक वळवण्याचा निर्णय झाला आहे. परंतु, तो कधीपासून अंमलात आणायचा, हे ठरवले नाही. ठाकुर्ली पुलावर दोन ठिकाणी वळणे असल्याने तेथे अपघाताची भीती आहे.
ठाकुर्ली पुलावरून होणार स्कूलबसची वाहतूक, अवजड वाहतुकीस मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 1:44 AM