डोंबिवली - शहरातील वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी ठाकुर्लीत उड्डाणपूल उभारून त्याची जोशी हायस्कूलकडील बाजू खुली करण्यात आली. मात्र, ठाकुर्लीतील रेल्वे समांतर रस्त्याला जोडणाऱ्या दुसºया बाजूचे काम रखडले आहे. पुलाच्या परिसरातील बांधकाम साहित्य, जुने काढलेले लोखंडी पाइप, भंगार, काँक्रिटचे गर्डर, खड्डे, चिखल, धूळ, कचराकुंड्यांची दुर्गंधी आदी अडथळ्यांची शर्यत पार करून वाट काढताना येथील रहिवासी आणि वाहनचालकांच्या नाकीनऊ येत आहे. त्यात अपघाताचा धोका असल्याने उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणार तरी कधी, असा सवाल ते करत आहेत.ठाकुर्ली स्थानकातील फाटक बंद करण्यासाठी पूर्व-पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल बांधण्यात आला. सध्या पुलाची जोशी हायस्कूलकडे उतरणारी मार्गिका सुरू झाली आहे. तर, ठाकुर्ली स्थानकाकडे जाणाºया बाजूचे काम जवळपास रखडले आहे. त्यातच, रेल्वेने फाटक बंद केल्याने आता सारस्वत कॉलनी, जोशी हायस्कूल परिसर, पंचायत विहीर, ठाकुर्ली-चोळे गावठाण या परिसरांत कोंडी होत आहे. महापालिका, वाहतूक आणि शहर पोलीस यांच्यातील समन्वयाअभावी वाहनचालकांना त्याचा चांगलाच फटका बसत आहे.वाहतुकीचे नियोजन सुरळीत व्हावे, यासाठी वाहतूक विभागाने परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचे ठरवले आहे. गणेशोत्सवानंतर त्याची अंमलबजावणी होईल, असे वाहतूक विभागाने सांगितले होते. परंतु, त्याला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. काही मार्ग हे एकदिशा, तर काही ठिकाणी वाहनांसाठी सम-विषम (पी-१,पी-२) पार्किंग पद्धत सुचवली आहे. तर, काही रस्त्यांवर वाहने उभी करण्यास बंदी आहे. या बदलाबाबत मात्र स्थानिकांमध्ये नाराजी आहे. अरुंद रस्त्यांवर वाहने उभी करायची तरी कशी, असा सवाल त्यांचा आहे. त्यामुळे वाहतूक सूचनांचे किती काटेकोरपणे पालन केले जाईल, याबाबत मात्र साशंकता आहे.दुसरीकडे ठाकुर्ली स्थानकाकडे जाणाºया पुलाचे मुख्य काम काही महिने रखडले आहे. सध्या किरकोळ कामे कासवगतीने सुरू आहेत. पुलाचे बांधकाम साहित्य, दुर्दशा झालेल्या रस्त्यांमुळे वाहनचालकांना पुलाखालून येजा करताना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. मोठमोठे लोखंडी पाइप, अस्ताव्यस्त पडलेल्या लोखंडी सळयांमुळे अपघाताची शक्यता व्यक्त होत आहे.ठाकुर्ली स्थानकाजवळ पुलाच्या दोन गर्डरचे काम सुरू आहे. त्यामुळे तेथील रिक्षा स्टॅण्डने तर रस्त्याचा अर्धा भाग व्यापला आहे. परिणामी, तेथेही वाहतूककोंडी आहे. त्यात, दुचाकी वाहनांचे पार्किंगही मार्गात अडथळा ठरत आहे. फाटक बंद केल्याने तेथे रिक्षा स्टॅण्ड नेले असते तर फायदेशीर ठरले असते. परंतु, तेथेही दुचाकी बेकायदेशीररीत्या उभ्या केल्या जात आहेत. पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी मोठमोठ्या क्रेन येत असल्याने कोंडीत अधिकच भर पडत आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने बांधकामांमुळे निर्माण झालेल्या धुळीचा त्रासही येथील रहिवाशांना होत आहे. या कामांमुळे एक प्रकारे या परिसराला अवकळा प्राप्त झाली आहे.शाळेच्या वेळेत कोंडीडोंबिवलीतील कोंडी सोडवण्यासाठी ठाकुर्लीत उड्डाणपूल उभारला जात आहे. मात्र, संथगतीने सुरू असलेल्या कामांमुळे आम्हाला मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या वाहतूककोंडी सातत्याने उद्भवते. दुपारी व सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळेसही मोठी कोंडी होते. धुळीचाही त्रास होत आहे. खड्ड्यांमुळे वाहन चालवणे एक प्रकारे डोकेदुखी ठरत आहे, असे रहिवासी पूजा किरावंत यांनी सांगितले.उड्डाणपुलामुळे छोट्या गल्ल्यांमध्येही रहदारी वाढली आहे. वाहनांच्या लांबवर रांगा लागत आहेत. काहीप्रसंगी वाहनचालकांमध्ये हमरीतुमरीचे प्रकारही घडले आहेत. वाहतूक पोलिसांचे यावर कोणतेही नियंत्रण नाही. अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. - नितीन प्रभुपाटकर, रहिवासी
ठाकुर्ली उड्डाणपुलाचे काम रखडले, रहिवाशांना होतोय मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 6:41 AM