डोंबिवली: शाळेचे शिक्षण महत्वाचे आहे, बालपणाचे शिक्षक महत्वाचे आहेत. त्यांनी मातीच्या गोळयाला घडवले म्हणुन आपण घडू शकलो, आपल्या जीवनात आई-वडील, भाऊ-बहिण आपल्या घराण्याएवढेच महत्व शिक्षकांना, गुरुंना आहे. आपल्याला जगात कोणाशीही तुलना होऊच शकणार नाहीत असे शिक्षक लाभल्यानेच आपण जीवनात स्वत:च्या पायावर उभे राहू शकलो, ते नसते तर आपण एवढे मोठे झालो असतो का? नाही, कधीहीनाही. त्यामुळे माझी शाळा, माझे शिक्षक हे महत्वाचे आहेत नव्हे ते आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबाचा एक भाग आहेत. वयाच्या साठीला, सत्तरीला आलेल्या शेकडो ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी शाळेचे आणि शिक्षकांचे मानावे तेवढे ऋ ण कमीच आहेत असे मत व्यक्त केले. निमित्त होते ते ठाकुर्लीच्या महिला समिती महाविद्यालयाला ६० वर्षे पूर्ण झाल्याने माजी विद्यार्थी संघाने भरवलेल्या संमेलनाचे.शनिवारी हा सोहळा शाळेच्या पटांगणात संपन्न झाला. कोणी आयएएस अधिकारी, कोणी डॉक्टर, कोणी देशसेवा करण्यासाठी सैन्यात, तर कोणी अन्य अन्य क्षेत्रात उच्चपदस्थ झालेले अधिकारी, काही जण तर सेवानिवृत्त झाले. पण शिक्षकांना भेटण्यासाठी, मित्र-मैत्रिणींना भेटण्यासाठी आतुर झालेले या ठिकाणी बघायला मिळाले. ५०० हून अधिक ज्येष्ठ माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत धम्माल केली. वयाचे भान न ठेवता, हास्यकल्लोळ केला. प्रचंड आनंद, समाधान एकमेकांच्या चेह-यावर ओसंडून वहात होते. विद्यार्थी समाधानी असतात त्याहून वेगळा तो आनंद काय असावा, जीवनात किती संपत्ती कमवली हे बघायचे असेल तर हा आमच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सोहळा बघायला, तो जल्लोष, नाद, गोंधळ, शांतता, शिस्त याची देही याची डोळा आजही बघायला मिळाली डोळयाचे पारणेच फिटले अशा शब्दात सेवानिवृत्त शिषकांनीही समाधान व्यक्त केले. पाल्य मोेठी होण, त्यांनी नावलौकिक मिळवण यापेक्षा सुख आणखी काय असते असे म्हणत भरुन पावलो सांगतांना शिक्षकवृंदाच्या डोळयामध्ये पाणी तरळले. हे आनंदाश्रु, समाधानाचे द्योतक असल्याचे सांगण्यात आले.ठाकुर्लीत १९५६ मध्ये ही शाळा सुरु झाली, पहिल्या वर्षी ४ विद्यार्थी होते हळुहळु शाळेचा पसारा मोठा झाला, आज या शाळेत प्रवेश नाही असे सांगतांना, बोर्ड लावतांना जीव -कंठ दाटून येतो असे सांगताच उपस्थितांमध्ये टाळयांचा कडकडाट झाला. शाळा मोठी होते ती शिस्तीमुळे आणि गुणी विद्यार्थ्यांमुळे. त्यात आजच्या ज्येष्ठ-माजी विद्यार्थ्यांच्या संमेलनामुळे शाळेने केलेले संस्काराची शिदोरी किती महत्वाची असते हे पटते. विज्ञान युगात, धावपळीच्या जमान्यात कोणालाही कोणासाठी वेळ नाही, पण येथे जमलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी शाळेसाठी, शिक्षकांसाठी आवर्जून वेळ काढला याहून दुसरा स्वर्गिय आनंद काय असू शकतो असे म्हणत उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या या स्तूत्य उपक्रमाचे कौतुक केले. सध्याकाळी ६.३० नंतर या सोहळयाला सुरुवात झाली, रात्री १० पर्यंत हे एकत्रिकरण होते. त्या कालावधीत अनेकांची मनोगत, १९६१ पासूनच्या शिक्षकांचे सत्कार, त्या आधीच्या संस्थांपकांचे सत्कार, त्यांची मनोगत आदी भरगच्च सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.माजी मुख्याध्यापिका चंद्रिका नायर, जया नायर, शामला नायर, शुभदा कुलकर्णी, रेल्वे पोलिस फोर्स आयुक्त रामभाऊ पवार, पहिल्या माजी विद्यार्थीनी वृंदा नाडकर्णी, यांची उपस्थिती विशेष असल्याची माहिती माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष उन्नीकृष्णन कुरुप यांनी लोकमत ला दिली. हा सोहळा यशस्वी होण्यासाठी सल्लागार शैलेंद्र पोपळे, शाजी मॅथ्यू, बिंदू कुरुप, कविता गावंड, मानसी दामले आदींसह माजी विद्यार्थी संघातील प्रत्येक सदस्याचे व आलेल्या शिक्षक वृंद, माजी-आजी विद्यार्थ्यांचे योगदान असल्याचे उन्नीकृष्णन म्हणाले.
ठाकुर्लीचे महिला समिती महाविद्यालय@६० : माजी विद्यार्थ्यांचे संम्मेलन संपन्न
By अनिकेत घमंडी | Published: December 09, 2017 7:05 PM
वयाच्या साठीला, सत्तरीला आलेल्या शेकडो ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी शाळेचे आणि शिक्षकांचे मानावे तेवढे ऋ ण कमीच आहेत असे मत व्यक्त केले. निमित्त होते ते ठाकुर्लीच्या महिला समिती महाविद्यालयाला ६० वर्षे पूर्ण झाल्याने माजी विद्यार्थी संघाने भरवलेल्या संमेलनाचे.
ठळक मुद्दे१९५६ मध्ये सुरु झाली शाळा ५०० माजी विद्यार्थी, ३०० शिक्षकवृंद उपस्थित