लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील विकासकामांचे लोकार्पण केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू करत असताना त्याचवेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही स्थानकात जाऊन केले आणि त्यातून या दोन्ही पक्षात श्रेयावरून सुरू असलेली चढाओढ समोर आली. ठाकुर्ली स्थानकाच्या विस्तारानंतर सोडलेल्या पहिल्या लोकलला हिरवा झेंडा दाखवून भाजपाने त्याचे श्रेय घेतल्याचे उट्टे काढण्यासाठी शिवसेनेने हा प्रकार केला. रेल्वेच्या रेल्वे स्थानकात केलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण प्रभू यांच्या हस्ते आॅनलाईन करण्यात आले. तिच वेळ साधत शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी पादचारी पुलावर श्रीफळ वाढवून त्याचे लोकार्पण केले. या वेळी नव्याने उभारण्यात आलेल्या फलाटावरील तिकीट खिडकी, प्रसाधनगृह आणि स्थानकाच्या फलकाचेही लोकार्पण करण्यात आले. महापौर राजेंद्र देवळेकर, युवा सेनेचे जिल्हाधिकारी दीपेश म्हात्रे, उप जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, शहरप्रमुख भाऊ चौधरी, नगरसेवक प्रकाश पेणकर, महिला आघाडीच्या कविता गावंड यांच्यासह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. ठाकुर्ली रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्मवर नवी तिकीट खिडकी सुरू झाली आहे. त्यामुळे जुन्या पादचारी पुलावरील खिडकी बंद करण्यात आली आहे. प्लॅटफॉर्मवर महिला आणि पुरुष प्रवाशांसाठी प्रसाधानगृह, कल्याणच्या दिशेने पादचारी पूल ही कामे करण्यात आली आहे. या कामांसाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे या कामांचे श्रेय घेण्याचा प्रश्नच उद््भवत नाही, असे लांडगे यांनी स्पष्ट केले. ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील विकासकामांचे लोकार्पण आटोपून कल्याण रेल्वे स्थानकात कर्जत व कसाऱ्याच्या दिशेने उभारलेल्या पादचारी पुलाचे लोकार्पणही शिवसेनेच्या हस्ते करण्यात आले. ठाकुर्लीच्या स्टेशन मास्तरांनी सांगितले, शिवसेनेच्या लोकार्पण सोहळ््यानिमित्त प्रशासनाकडून अधिकृतपणे कळविण्यात आलेले नाही. तो त्यांचा पक्षीय कार्यक्रम आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते कामांचे लोकार्पण आॅनलाईन होत आहे. त्यानुसार नव्या प्लॅटफॉर्मवर तिकीट खिडकी सुरु करण्यात आली आहे. ठाकुर्लीच्या विस्तारीकरणासाठी ९ एप्रिलला आठ तासाचा मेगा व पॉवर ब्लॉक घेण्यात आला. त्यानंतर तेथून निघालेल्या पहिल्या लोकलला भाजपाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवला. भाजपाने तेव्हा सेनेवर कुरघोडी केली. ठाकुर्लीच्या कामांसाठी १२ वर्षे भाजपाचे माजी नगरसेवक श्रीकर चौधरी हे पाठपुरावा करीत आहेत. राज्यमंत्री चव्हाण हे पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने त्यांच्या अनुपस्थितीची संधी साधत शिवसेनेने उट्टे काढले. ही कामे आघाडी सरकारच्या काळातील असून ती आता पूर्ण झाल्याचे माजी खासदार आनंद परांजपे यांनी लक्षात आणून दिले आणि श्रेय घेणाऱ्या दोन्ही पक्षांना टोला लगावला.
ठाकुर्लीच्या श्रेयावरून पुन्हा युती भिडली
By admin | Published: May 23, 2017 1:56 AM