कल्याण : ठाणे जिल्ह्यात आजमितीस थॅलेसिमिया आजार असलेल्या मुलांची संख्या ८०० आहे. हा आजार असलेल्या मुलांना दर महिन्याला रक्ताची गरज असते. रोट्रॅक्टकडून राबविलेल्या रक्तदान शिबिरातून थॅलेसिमियाग्रस्तांना मोफत रक्तपुरवठा केला जातो. ठाणे जिल्हा २०२३ पर्यंत थॅलेसिमियामुक्त करण्याचे लक्ष्य आम्ही डोळ्यासमोर ठेवले असल्याची माहिती डिस्ट्रिक रोट्रॅक्ट रिप्रेझेंटिव्ह रहेश डॉनी यांनी दिली आहे.
डोनी यांनी सांगितले की, कोरोनाकाळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने रक्तपुरवठा करणाऱ्या पेढ्यांतून आमच्याकडे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याची मागणी केली जाऊ लागली. त्यानंतर आम्ही रक्ताची गरज ओळखून रक्तदान शिबिरे घेतली. कोरोनाकाळात प्लाझ्मा आवश्यक होता. त्यासाठी जे कोरोना रुग्ण कोरोनातून बरे होतील, त्यांची माहिती गोळा करून त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना प्लाझ्मा दानासाठी आवाहन केले. ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णाकरिता जवळपास ३०० प्लाझ्मा दाते मिळवून प्लाझ्मा उपलब्ध करून दिला आहे. केवळ ठाणे जिल्ह्यातच नव्हे, तर पुणे, सातारा याठिकाणच्या रुग्णांनाही प्लाझ्मा मिळवून देण्याचे काम रोट्रॅक्टच्या माध्यमातून केले आहे.
ते पुढे म्हणाले, कोरोनाकाळातील कामगिरीसोबत थॅलेसिमिया आजाराच्या मुलांना दर महिन्याला मोफत रक्त उपलब्ध करून दिले जाते. थॅलेसिमिया आजारावरील उपचार खर्चिक आहे. एका रुग्णावर सहा कोटी रुपयांचा खर्च त्याच्या पूर्ण जीवनकाळात होऊ शकतो. त्याचे जीवनमान केवळ ३० वर्षांपर्यंत असते. ठाणे जिल्ह्यात ८०० रुग्ण असून, ते थॅलेसिमियामुक्त करण्यासाठी लक्ष्य ठेवले आहे. जे थॅलेसिमिया मायनर आहेत, त्यांनी विवाह करतानाच त्यांचे समुपदेशन करून त्यांनी मुले जन्माला घालताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी जनजागृती रोट्रॅक्ट क्लबकडून सुरू आहे.
वर्षभरात एकही मूल थॅलेसिमियाग्रस्त नाही
नवी मुंबईत ४०, तर ठाणे जिल्ह्यात ८०० मुले थॅलेसिमियाग्रस्त आहेत. जनजागृतीमुळे गेल्या वर्षभरात एकही मूल थॅलेसिमियाग्रस्त म्हणून जन्माला आलेले नसल्याची बाबही डॉनी यांनी नमूद केली आहे.
फोटो : ०२ कल्याण-रहेश डॉनी
---------------------