ठाणे : धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि दिव्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी धमकी दिल्याचा आरोप करून तक्रार दाखल केल्यानंतर आता महापालिकेचे दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त महेश आहेर यांच्या अडचणींत आणखी वाढ झाली आहे. राष्ट्रवादीने आहेर यांच्या शैक्षणिक पात्रतेवरच आक्षेप घेऊन स्थावर मालमत्ता विभाग अधीक्षक तसेच सहायक आयुक्त या दोन्ही पदांसाठी पात्र नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ पदमुक्त करून त्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
आहेर यांची शैक्षणिक पात्रता पाहता ते दोनही पदांसाठी लायक नाहीत. त्यांचे शालेय शिक्षण हे सरस्वती सेकंडरी विद्यालयातून झाले असून, ज्ञानसाधना महाविद्यालयात त्यांनी १५ जून १९८३ ला अकरावी कलासाठी प्रवेश घेतला होता. तेथे ते नापास झाले असल्याने २ जानेवारी १९८५ रोजी सुमारे दोन वर्षे एकाच वर्गात राहिल्याने त्यांच्या पालकांनी त्यांना महाविद्यालयातून काढले होते. म्हणजेच त्यांचे शिक्षण हे दहावी उत्तीर्णच आहे, तरीही विनायका मिशन, सिक्कीम येथून त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी मिळवलेली आहे. ती बनावट असण्याची शक्यता आहे. लिपिक या पदावर ठामपा सेवेत असणाऱ्या आहेर यांना अत्यंत वेगवान पद्धतीने ठामपाच्या सेवेत बढत्या दिलेल्या आहेत. त्यातूनच त्यांना दिवा प्रभाग समितीमध्ये सहायक आयुक्तपदी नियुक्त केलेले आहे. या काळात सदर मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे झालेली आहेत. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. स्थावर मालमत्ता विभागामध्ये ते कार्यरत असून आहेर यांनी अनेकांना बीएसयूपी आणि गाळ्यांचे वाटप केल्याचा आरोपही परांजपे यांनी केला. मध्यंतरी, कासारवडवली पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल केलेला होता. त्यामध्ये आहेर यांनीच आपली बनावट सही केली असल्याचे नमूद केले होते; परंतु या सह्यांची हस्ताक्षरतज्ज्ञांकडून तपासणी झालेली नाही. ॲक्मे, एमएमआरडीए येथील अनेक घरे आणि गाळे बेकायदेशीरपणे भाडेतत्त्वावर दिल्याप्रकरणी स्थावर मालमत्ता विभागातील एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली होती. स्थावर मालमत्ता अधीक्षकांच्या मर्जीशिवाय हे कृत्य होण्याची शक्यता अगदीच धूसर आहे. त्यामुळे अशी घरे बेकायदेशीरपणे भाडेतत्त्वावर देण्यामध्ये आहेर यांचा मोठा सहभाग असू शकतो, असेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, वास्तविक पाहता त्यांचा सेवाकाळ पाहता ते जास्तीत जास्त अ वर्ग लिपिक होऊ शकतात. अशा स्थितीमध्ये त्यांना दिलेले पोलीस संरक्षणही संशयास्पद आहे. त्यांना परदेशातून धमकीचा फोन आल्याचा गवगवा झाला होता. तो कोणी आणि कुठून व का केला होता, याच्याही चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.