ठाणे : ठाणे महापालिका अद्यापही कोरोनातून सावरली नसल्याचेच दिसत आहे. कोरोनाचा उत्पन्नावर परिणाम झाल्याने आणि इतर खर्चांचा भार वाढल्याने महापालिकेच्या तिजोरीत अवघे १६ कोटी शिल्लक आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता गुरुवारपासून नवीन बिले घेण्यासह जुनी बिले देणे थांबविले आहे.
जवळजवळ दीड वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने त्याचा परिणाम ठाणे महापालिकेच्या उत्पन्नावरदेखील झाला आहे. केवळ मालमत्ता आणि पाणीकरातून अपेक्षित उत्पन्न मिळत आहे. परंतु, प्रशासनाने दिलेल्या स्कीममुळे जून ते जुलै अखेरपर्यंत उत्पन्न मिळाले होते. त्यानंतर आता स्कीमही बंद झाल्याने ठाणेकर करदात्यांनी कराचा भरणा करण्यासही विलंब सुरू केला आहे. त्याचा परिणाम पालिकेच्या तिजोरीवर झाला आहे. या तिजोरीत सर्व खर्च करून सध्याच्या घडीला केवळ १६ कोटींचाच निधी शिल्लक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यातही कोरोनातील अत्यावश्यक सेवेतील पगार आणि डायघर वीजप्रकल्पासाठी अचानक आठ कोटींचा खर्च केल्याने महापालिकेवर १७ कोटींचा बोजा पडला.
तिजोरीत निधी कमी झाल्याने गुरुवारपासून नवीन बिले घेण्याबरोबर जुनी बिले देण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे ठेकेदारांची बिले पुन्हा लांबणीवर पडणार असल्याचे दिसत आहे. त्यातही मागील काही महिन्यांत ठेकेदारांचीदेखील २०१९ पासूनची सुमारे १७ कोटींची बिले अदा केली आहेत. परंतु, सध्या तिजोरीत खडखडात झाल्याने बिले थांबविली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एमएमआरडीएचे ३६ कोटीही देणे
पालिकेने काही प्रकल्पांसाठी एमएमआरडीएकडून ३०० कोटींचे कर्ज घेतले होते. त्यातील १६४ कोटींची देणी अद्यापही देण्याचे शिल्लक आहे. त्यानुसार याचा वार्षिक हप्ता ३६ कोटींचा आहे. तोदेखील याच महिन्यात आल्याने तो कसा द्यायचा असा पेच आता प्रशासनाला सतावू लागला आहे.