ठाणे : महापालिकेने आपल्या ३० हजार विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी दरमहा २०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात येत्या महासभेच्या पटलावर हा विषय ठेवला असून, घरी राहून ऑनलाइन शिक्षण घेतानाच प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे यासाठीही अनुदान देण्यात येणार असून, हे दाेन्ही प्रस्ताव शुक्रवारच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवले आहेत. यासाठी सात कोटी ९९ लाख ८९ हजार ९१६ रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये आजच्या घडीला सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु, मागील वर्षापासून त्यांना कोरोनामुळे शाळेत जाताच आले नाही. त्यामुळे यंदा घरबसल्या शिक्षण घेता यावे या उद्देशाने ऑनलाइन शैक्षणिक उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार जे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणासाठी रोजच्या रोज हजर राहतील, अशा विद्यार्थ्यांच्या खात्यात दरमहा २०० रुपये टाकले जाणार आहेत. तसेच या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेताना त्यांच्याकडे वह्या, पुस्तके, इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध असावे, गणवेश, स्वेटर, रेनकोट आदी साहित्यदेखील त्यांच्याकडे असावे या उद्देशाने शिक्षण विभागाने शैक्षणिक साहित्याचा खर्च त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने यापूर्वीच शैक्षणिक साहित्याचा खर्च हा विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिलेले आहेत.
आता शाळा बंद असल्यातरी शाळा चालू झाल्यास पुन्हा ऐनवेळेस विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक साहित्य नाही, म्हणून आबाळ होऊ नये या उद्देशाने शिक्षण विभागाने त्यासाठीचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.