ठाणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज झाली आहे. आता गृहविलगीकरण बंद केल्याने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिका २२ अलगीकरण केंद्रांत तब्बल १२ हजार, तर रुग्णालयांंत पाच हजार ४४८च्या वर बेड उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.
कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली असून, आता शहरदेखील पूर्वपदावर येऊ लागले आहे. परंतु, येत्या दोन ते तीन महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याने त्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे. त्या अनुषंगाने पार्किंग प्लाझा येथे लहान मुलांसाठी १०० बेडची व्यवस्था केली आहे. शिवाय व्होल्टास, बुश कंपनी येथील कोविड सेंटरही सुरू करण्याची तयारी केली आहे. तसेच १० कोटींचा ३५० प्रकारांचा औषध साठादेखील खरेदी केला आहे. ऑक्सिजन प्लांट उभारणीबरोबर इतर संस्थांकडून तो जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध करून घेण्यासाठी पावले उचलली आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्यातील १८ जिल्ह्यांत गृहविलगीकरण बंद करण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने आता तयारी सुरू केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या जास्त असतानाही रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे तिसरी लाट आल्यास नेमकी परिस्थिती कशी असेल, याचा अंदाज महापालिकेला नाही. परंतु, तरीदेखील आता गृहविलगीकरण बंद केल्याने संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी २२ अलगीकरण केंद्र सुरू करण्याची तयारी केली आहे. ही केंद्र जून अखेरपर्यंत सज्ज ठेवली जाणार आहेत. यामध्ये शाळा, महापालिकेच्या इमारती, रेंटलच्या इमारती आदींचा समावेश आहे. त्यानुसार या ठिकाणी तब्बल १२ हजार बेडची निर्मिती केली जाणार आहे. या ठिकाणी १५ टीम सज्ज केल्या जाणार आहेत. याशिवाय लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी पाच हजार ४४८ बेड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यातही आता व्होल्टास आणि बुश कंपनी येथील कोविड सेंटरची भर पडणार आहे.
.....
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज झाली आहे. मुबलक औषधसाठा, ऑक्सिजन, पीपीई किट, लहान मुलांसाठी बेड, तसेच गृहविलगीकरण बंद केल्याने २२ अलगीकरण केंद्रांच्या माध्यमातून रुग्णांसाठी १२ हजार बेड उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
(गणेश देशमुख - अतिरिक्त आयुक्त, ठामपा )