ठाणे : दिवा डम्पिंग ग्राउंडपासून दिवावासीयांची सुटका करण्यासाठी महापालिका हद्दीबाहेर असलेले भूखंड भाडेतत्त्वावर डम्पिंगसाठी ताब्यात घेण्यात यावेत, तसेच सद्यस्थितीत दिवा येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचे मातीच्या भरावाने सपाटीकरण करून दुर्गंधी पसरू नये या दृष्टिकोनातून ठोस उपाययोजना तातडीने करण्याचे महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यासोबत मंगळवारी झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले.
दिवा डम्पिंग ग्राउंडबाबत नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. यामुळे उद्भवणाऱ्या विविध समस्या व नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने मंगळवारी महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली व महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती संजय भोईर, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, राष्ट्रवादीचे गटनेते नजीब मुल्ला, दिवा प्रभाग समिती अध्यक्षा सुनीता मुंडे, माजी उपमहापौर नगरसेवक रमाकांत मढवी,शैलेश पाटील, नगरसेविका दर्शना म्हात्रे, अंकिता पाटील, दीपाली भगत, अमर पाटील, दीपक जाधव, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त अशोक बुरपल्ले, मनीष जोशी, सहायक संचालक नगररचना सतीश उगिले, आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर, उपनगर अभियंता नितीन येसुगडे, शहर नियोजन अधिकारी शैलेश बेंडाळे आदी उपस्थित होते.
या बैठकीत दिवा डम्पिंग ग्राउंडसंदर्भात नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत चर्चा करण्यात आली. ठाणे महापालिका हद्दीत ज्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड आरक्षण आहे, त्या जागेवर अतिक्रमणे झाली असल्यास त्यावर ताबडतोब कार्यवाही करून त्या जागा ताब्यात घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचा निर्णयदेखील यावेळी घेण्यात आला. तसेच महापालिकेच्या कायमस्वरुपी डम्पिंग ग्राउंडसाठी जागा निश्चित करण्यासाठी नगरसेवक व अधिकारी यांची एक कमिटी स्थापन करून तिने डम्पिंग ग्राउंड अभ्यास करून त्याबाबत वेळोवेळी महापौर व आयुक्त यांच्याशी चर्चा करावी असे या बैठकीत ठरविण्यात आले.