ठाणे : रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी विविध तंत्रज्ञानांचा वापर केल्यानंतर आता ठाणे महापालिकेने खड्डा दाखवा, तो आम्ही दोन तासांत बुजवू, असा दावा केला आहे. खड्डे बुजवण्याचा प्रतिसाद कालावधी कमी केला असून तत्काळ ते बुजवण्याची हमी दिली आहे. तसेच स्टारग्रेड अॅपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींचेसुद्धा तत्काळ निराकरण करण्याचा दावा केला आहे.महापालिका हद्दीत मागील काही दिवसांपासून रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. ते बुजवण्यासाठी विविध तंत्रज्ञानांचा वापर केला आहे. यातील काही तंत्रज्ञान यशस्वी झाले, तर काही अक्षरश: फेल गेले आहे. परंतु, पावसाने उसंत घेतल्यानंतर पालिकेने शहरात विशेष मोहीम हाती घेऊन आतापर्यंत ७५ टक्के खड्डे बुजवले आहे. तसेच उर्वरित खड्डे पाच ते सहा दिवसांत बुजवण्यात येतील, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.>आतापर्यंत या तंत्रज्ञानांचा केला वापरआतापर्यंत पालिकेने पुलांवरील खड्डे बुजवण्यासाठी अॅक्वा पॅच या तंज्ञत्रानाचा वापर केला असून त्यानुसार ८.१८ स्क्वेअर मीटरचे खड्डे त्यापासून बुजवले आहेत. यासाठी ६४ हजार ८०० रुपयांचा खर्च केला आहे. तर, इस्मॅक पीआर या पॉलिमर तंत्रज्ञानाचा वापरसुद्धा खड्डे बुजवण्यासाठी केला असून त्यानुसार १११.३६ स्क्वेअर मीटरचे खड्डे बुजवले आहेत. त्यावर एक लाख ६० हजार ८३८ रुपयांचा खर्च केला आहे. एमसिक्स्टी ग्रेडच्या तंत्रज्ञानात ३९०० स्क्वेअर मीटरचे खड्डे बुजवले असून त्यावर ४२ लाख ३८ हजार १३० रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तर, रेन पॉलिमर या तंत्रज्ञानात ९०९.९ स्क्वेअर मीटरचे खड्डे बुजवण्यात आले असून यासाठी १५ लाख ९३ हजारांचा खर्चकेला आहे.>स्टार ग्रेडवरील तक्रारी तत्काळ सोडवणारआता तत्काळ खड्डे बुजवण्यासाठीचा प्रतिसाद कालावधी कमी करण्यात आला असून खड्ड्यांची तक्रार करा, पुढील दोन तासांच्या आत ते बुजवले जातील, अशी हमी पालिकेने दिली आहे. तसेच स्टार ग्रेड अॅपवरसुद्धा त्याच्या तक्रारी आल्यास त्याचे निराकरण तत्काळ केले जाणार आहे. त्यातही यापूर्वी या अॅपवर नागरिकांना केवळ तक्रारीच करता येत होत्या. परंतु, आता केलेल्या तक्रारींवर काय कारवाई झाली, खड्डे बुजवले अथवा नाही, याची माहितीसुद्धा त्यांच्या मोबाइलवर दिली जाणार आहे.
ठामपा दोन तासांत खड्डा बुजवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 2:27 AM