ठाणे, दि. 18 - चित्रकलेतील ‘प्रिंट मेंकिंग’ या कलाप्रकारात काम करणाऱ्या कलावंतांना प्रेरणा देण्यासाठी, नव्या-जुन्या कलावंतांशी संवाद साधण्यासाठी ठाण्यातील आर्ट प्रिव्हिलेज हे कलादालन गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करीत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जगप्रसिद्ध शांतीनिकेतन या रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन 2० सप्टेंबर 2०17पासून ‘आर्ट प्रिव्हिलेज, 5, श्री शांता निवास, कर्वे हॉस्पिटलच्या समोर, ब्राम्हण सोसायटी ठाणे (प.) येथे भरवीले आहे अशी माहिती आर्ट प्रिव्हिलेज गॅलरीचे प्रमुख आणि या उपक्रमाचे समन्वयक प्रीतम देऊस्कर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
हे प्रदर्शन 30 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून, रसिकांना ते नि:शुल्क बघता येणार आहे. या प्रदर्शनात शांतीनिकेतनच्या 18 प्रिंटमेकर्सने साकारलेल्या कलाकृती सादर करण्यात येणार असून, याच उपक्रमाचा एक भाग म्हणून शांतीनिकेतनचे 11 विद्यार्थी प्रदर्शनकाळात काही कलाकृतींची निर्मितीही करणार आहेत. शांतीनिकेतनच्या विद्यार्थ्यांनी ठाण्यातील कलादालनात येऊन, त्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवणे आणि प्रिंटमेंकिंग करणे हे आम्हा कलावंतांसाठी आनंदाचा, उत्साहाचा आणि प्रेरणादायी प्रसंग आहे असे देऊस्कर यांनी सांगितले.
शांतीनिकेतनच्या विद्यार्थ्यांची निवासी कार्यशाळा 20 ते 25 सप्टेंबर दरम्यान होणार असून, ज्या अभ्यासकांना ही कलानिर्मिती होताना पाहायची असेल, त्यांच्याशी संवाद साधायचा असल्यास पूर्वसूचना देऊन सहभागी होता येईल, असे त्यांनी कळविले आहे.ठाण्यातील आर्ट प्रिव्हिलेज कलादालनात ज्येष्ठ कलावंतांसोबत उदयनोन्मुख कलावंतांचा संवाद होण्याचा उपक्रम काही दिवसांपासून सुरू झाला. फक्त चित्रांचे प्रदर्शन नव्हे तर चित्रांवर चर्चा व्हावी, त्यातून नव्या कलावंतांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमाचे हे महत्त्वाचे पुष्प 2० सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता गुंफले जाणार असून, प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध आर्किटेक चंद्रशेखर कानेटकर आणि सुप्रसिद्ध प्रिंटमेकर विलास शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.