- प्रज्ञा म्हात्रेठाणे - प्रत्येक उत्सव हा हरित उत्सव व्हावा यासाठी गेली बारा वर्षे काम करीत असलेल्या समर्थ भारत व्यासपीठाच्या महानिर्माल्य अभियानाला गणेशभक्तांनी याही वर्षे उदंड प्रतिसाद दिला. दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाच्यावेळी यंदा १० टनाहून अधिक निर्माल्य भक्तांनी दान केले. यावर्षी निर्माल्यातील अविघटनशिल घटकांचे प्रमाण लक्षणियरित्या घट असल्याचे निदर्शनास आले आहे.
ठाणे महानगरपालिका आणि समर्थ भारत व्यासपीठ गेली १२ वर्षे गणेशोत्सव काळातील निर्माल्य व्यवस्थापन करीत आहे. तलावांचे शहर असलेल्या ठाण्याने कृतीम तलाव व निर्माल्य व्यवस्थापन असे दोन अभिनव उपक्रम महाराष्ट्राला दिले आहेत. प्रत्येक उत्सव हा हरित उत्सव व्हावा व पर्यावरणाचे जतन, रक्षण तसेच सर्वधन व्हावे यासाठी समर्थ भारत व्यासपीठ नेहमीच प्रयत्नशिल असते यात ठाणे महानगरपालिका, रोटरी क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटी तसेच प्रकल्प पुर्ननिर्माणचे सदस्य सहयोग देत असतात. दीड दिवसाच्या गणपतीत १० टनाहुन अधिक निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे.
तसेच निर्माल्यातील अविघटनशिल घटकांचे वर्गीकरण करून ते पुर्नप्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहेत. यावर्षी अविघटनशिल घटक जसे की, प्लास्टीक, थर्मोकोल यांचे निर्माल्यातील प्रमाण लक्षणियरित्या कमी झाले असुन केवळ ४ टक्केच म्हणजे ४०० किलोच अजैविक कचरा आढळुन आला. गेल्या १२ वर्षांच्या सातत्यपुर्ण जनजागृती, कृतीरूप कार्यक्रमामुळे हे शक्य झाले आहे. यात पर्यावरणस्नेही गणेशभक्त व समर्थ भारत व्यासपीठाशी संलग्न सफाईसेवक महिलांचे अनन्यसाधारण असे योगदान लाभले आहे अशी प्रतिक्रिया समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक सुजय कुलकर्णी यांनी व्यक्त केली. दीड दिवसांच्या गणपती सोबत पाच, सात आणि दहा दिवसांच्या गणपतीच्या विजर्सनाच्यावेळी देखील निर्माल्य संकलित करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी तलावात,खाडीत निर्माल्य विसर्जित न करता ते विसर्जन घाटावर ठाणे महानगरपालिकेच्या निर्माल्य स्वीकार केंद्रात दान करावे असे आवाहन व्यासपीठाचे संचालक सुजय कुलकर्णी यांनी केले आहे.