- प्रज्ञा म्हात्रे ठाणे - जिल्ह्यातील १२ तरुण जलतरणपटूंनी तलाईमन्नार (श्रीलंका) ते धनुष्कोडी (भारत) हे २३ किलोमीटर सागरी अंतर १० तास १० मिनिटांमध्ये यशस्विरित्या पोहून इतिहास घडविला. हा अंतरराष्ट्रीय उपक्रम करणारा ठाणे ज़िल्ह्यातील पहिला संघ आहे.
अर्णव पाटील (वय ९ वर्षे), स्वरा हंजणकर (वय ११ वर्षे), अभिर साळसकर (वय ११ वर्षे), वंशिका अय्यर (वय १२ वर्षे), शार्दुल सोनटक्के (वय १२ वर्षे), रुद्र शिराळी (वय १३ वर्षे), अपूर्व पवार (वय १५ वर्षे), अथर्व पवार (वय १५ वर्षे), सविओला मस्करेन्हास (वय १६ वर्षे), स्वरा सावंत (वय १७ वर्षे), लौकिक पेडणेकर (वय १८ वर्षे) आणि मीत गुप्ते (वय १८ वर्षे) या १२ भारतीय जलतरणपटूंनी ४ मे २०२४ रोजी पहाटे श्रीलंकेच्या तलाईमन्नार येथून पोहणयास सुरुवात करून धनुषकोडी, भारत येथे दुपारी यशस्वीरित्या पार पाडले. हवामान अतिशय प्रतिकूल होते व वाऱ्याचा वेग ताशी ३० कि.मी होता. समुद्रात लाटांची उंची १.१ मीटर असून दिशा दक्षिण पश्चिमेकडे होती, जी पोहण्यासाठी पूर्णपणे प्रतिकूल होती. संपूर्ण हवामान खूप वादळी होते.
जलतरणपटूंनी या प्रतिकूल परिस्थितीचा यशस्वीपणे सामना केला आणि रिले पॅटर्नमध्ये १० तास १० मिनिटांत हे अंतर पोहून पूर्ण केले. ९ ते १८ वर्षे वयोगटातील १२ तरुण जलतरणपटूंमध्ये धैर्य, इच्छाशक्ती, सहनशक्ती आणि दृढनिश्चय यांचे परिपूर्ण प्रात्यक्षिक दिसून आले. या संघाला रामचंद्र ठाकूर जलतरण तलाव, ठाणे येथे मुख्य प्रशिक्षक नरेंद्र पवार यांनी प्रशिक्षण दिले तर पोहण्याच्या प्रशिक्षणाला भारती सावंत यांचेही सहकार्य लाभले. या प्रकल्पाच्या प्रमुख अर्जुन आणि शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आरती प्रधान होत्या.