ठाणे: ठाणे पोलिसांच्या ‘टॉप २०’ कुख्यात सोनसाखळी चोरटयांच्या यादीतील सफर उर्फ असदउल्ला अखत्तर हुसेन खान उर्फ जाफरी (१८) या अट्टल चोरटयास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे कक्षाच्या पथकाने मुंब्रा येथून अटक केली आहे. त्याने १३ गुन्हयांची कबूली दिली असून त्याच्याकडून २५७ ग्रॅम वजनाचे चार लाख ९४ हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त एन. टी. कदम यांनी दिली.कळव्याच्या पाटीलनगर परिसरातील रहिवाशी सुनंदा थोरात (४७) या १९ नोव्हेंबर २०१७ रोजी त्यांच्या मैत्रिणीसह खारेगाव कळवा येथील गोल्डन चायनीज दुकानाच्या जवळून रात्री ८ वाजण्याच्या सुमारास जात असतांना एका दुचाकीवरुन आलेल्या दोन भामटयांनी त्यांच्या गळयातील सोनसाखळी आणि मंगळसूत्र हिसकावून पलायन केले हाते. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली होती. याच प्रकरणाचा तपास मालमत्ता कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता. ही सोनसाखळी चोरी ठाणे पोलिसांच्या रेकॉर्ड वरील सराईत सोनसाखळी चोर सफर खान याने केल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे १३ डिसेंबर रोजी सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद सानप यांच्या पथकाने त्याला मुंब्य्रातून अटक केली. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्यानंतर चौकशीत त्याने या जबरी चोरीची कबूली दिली. शिवाय, कोपरी, कळवा, मानपाडा, वर्तकनगर, चितळसर, कासारवडवली, कापूरबावडी, कोळसेवाडी आदी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील तब्बल १३ ठिकाणी सोनसाखळी चोरी केल्याचीही त्याने कबूली दिली. त्याला २४ डिसेंबर रोजी वर्तकनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आठ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील चार लाख ९४ हजारांचा ऐवज त्याच्याकडून हस्तगत केल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.