ठाणे : क्षुल्लक कारणावरून अमय गावडे (२२, रा. कासारवडवली, ठाणे) या कारचालकाशी गावदेवी मंदिरासमोर वादावादी करणाऱ्या अरविंद यादव (३२, रा. गांधीनगर, ठाणे) याच्यासह १४ रिक्षाचालकांना नौपाडा पोलिसांनी गुरुवारी पहाटे अटक केली. त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.गावदेवी मंदिर येथे नव्यानेच घेतलेली कार पूजा करण्यासाठी गावडे यांनी ११ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कुटुंबीयांसह आणली होती. तिथे कार पुढे करण्यावरून त्यांचा काही रिक्षाचालकांशी वाद झाला. त्याचवेळी यादव यांच्या रिक्षाची त्यांच्या कारला धडक बसली. यादव यांनी मुद्दाम ही धडक दिल्याचा समज झाल्याने त्यांच्यात वाद झाला. यातूनच झालेल्या बाचाबाचीतून तिथे अन्यही काही रिक्षाचालकांनी त्यांच्याशी वाद घातला. नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर शिवप्रकाश तिवारी, राजेंद्र विश्वकर्मा, शैलेंद्र जयस्वाल, सुनीलकुमार मुदलियार, गोरक्षनाथ शिरोळे आणि संदीप वाघ आदी १४ रिक्षाचालकांना अटक करण्यात आली. दरम्यान, गावडे यांच्याविरुद्ध यादव या रिक्षाचालकाने दाखल केलेल्या अदखलपात्र तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्धही प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. त्यांचीही गुरुवारी दुपारी जामिनावर सुटका झाल्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले.
ठाण्यात क्षुल्लक कारणावरून वाद : १४ रिक्षाचालकांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 9:22 PM
एका रिक्षाने कारला गावदेवी मंदिरासमोर धडक दिल्यानंतर दोन गटात वाद झाला. याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी गुरुवारी १४ रिक्षा चालकांना अटक केली. तर कार चालकावरही प्रतिबंधात्मक कारवाई केली.
ठळक मुद्दे गावदेवी मंदिरासमोर झाला वादकारला रिक्षाची धडकनौपाडा पोलिसांनी केली कारवाई