ठाणे : पाणीगळती, चोरी, वितरण व्यवस्था भक्कम करतांनाच ठाणेकरांना येत्या काळात २४ बाय सात म्हणजेच आठवड्याचे सातही दिवस २४ तास पाणी देण्यासाठीचे नियोजन करण्यास पालिकेने सुरुवात केली या संदर्भातील पहिला पायलट प्रोजेक्ट उथळसर प्रभाग समितीत राबविला जाणार असून या संदर्भातील अॅटोमॅटीक मीटरची निविदा मागविली आहे. यानुसार पुढील तीन वर्षात या भागातील तब्बल १४ हजार ५०० ग्राहकांना २४ तास पाणी मिळणार आहे. ठाणे महापालिकेने पाणी व्यवस्था मजबुत करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार रिमॉडेलींग योजना, वॉटर आॅडिट, वॉटर किआॅक्स, स्मार्ट मीटर, पाणीगळती रोखणे, चोरीवर निर्बंध घालण्यासाठी २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात भरीव अशी तरतूद केली आहे. महापालिका हद्दीतील सद्यस्थितीत २३.५० लाख लोकसंख्येला सरासरी २ ते ६ तास एवढ्या कालावधीत ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. आता ठाणेकरांसाठी २४ तास पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना पालिकेने प्रस्तावित केली आहे. त्यानुसार हा प्रकल्प ५ वर्षात पूर्ण करण्याची पालिकेची इच्छा असून २० वर्ष कालावधीसाठी देखभाल दुरुस्तीसह राबविण्याचा पालिकेचा मानस आहे. यामध्ये अस्तित्वातील व नव्याने अंथरण्यात येणाऱ्या वाहिन्यांचा लेखाजोखा करुन गळती शोधणे, ती बंद करणे, जलमापकांचे वाचन व त्याचे देयक वितरीत करुन प्रभावीपणे त्याची वसुली करणे आदी बाबींचा यामध्ये अंतर्भाव केला आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर नागरिकांना २४ तास शुद्ध व स्वच्छ पाणी भारतीय मानकाप्रमाणे उपलब्ध होणार आहे. तर वाया जाणाऱ्या पाण्याची बचत होऊन सुयोग्य नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी ५० कोटींची आर्थिक तरतूद प्रस्तावित केली आहे. (प्रतिनिधी) - आता अर्थसंकल्पात नमूद केलेल्या बाबींचा विचार करुन पहिला पायलेट प्रोजेक्ट उथळसर प्रभाग समितीमध्ये कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील आॅटोमॅटीक मीटरची निविदा मागविल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर या प्रभाग समितीमध्ये हा प्रयोग राबविला जाणार आहे. - याअंतर्गत सिद्धेश्वर जलकुंभ, जेल जलकुंभ, ऋुतूपार्क, रुस्तमजी जलकुंभाखालील वितरण व्यवस्था मजबुत करण्यात येणार असून या जलकुंभांवरुन पाणी पहिल्या टप्यात १४ हजार ५०० ग्राहकांना मिळणार असून तीन वर्षात योजना पूर्ण होणार आहे. - ही योजना अंशत: पीपीपी तत्वावर राबविली जाणार असून 70%रक्कम संबधीत विकासकाला काम सुरु असताना आणि उर्वरित रक्कम ही पुढील सात वर्षांच्या देखभाल दुरुस्तीच्या कालावधीत दिली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
ठाण्यात २४ बाय ७ पाणीपुरवठा
By admin | Published: April 12, 2017 3:40 AM