लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : विवाहसोहळा आणि विवाहमुहूर्ताची तारीख संस्मरणीय राहावी, यासाठी अनोख्या तारखेला विवाह करण्याची जोडप्यांमध्ये वेगळीच क्रेझ असते. शुक्रवारी, १ जानेवारीला नववर्षाच्या सुरुवातीला ३० जोडपे विवाहाच्या बंधनात अडकले. ठाणे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयात त्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला.एखादी अनोखी तारीख तसेच १४ फेब्रुवारी प्रेमाचा दिवस असो की, अक्षय तृतीया, गुढीपाडवा या दिवशी जोडप्यांकडून विवाह सोहळ्याचा हमखास मुहूर्त साधला जातो. परंतु, यंदा मार्चपासून जगभरात कोरोनाची साथ पसरली. देशभरात लॉकडाऊन लागू झाल्याने अनेकांना हॉलमध्ये होणारे सोहळे रद्द करावे लागले होते. २३ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत, तसेच एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रायोगिक तत्त्वावर विवाह नोंदणी कार्यालय सुरू केले होते, परंतु कोरोनाची भीती असल्याने एकही विवाह झाला नाही. मार्च ते मे या महिन्यात विवाह मुहूर्त असल्याने मोठ्या प्रमाणात विवाहसोहळे होत असतात, परंतु कोरोनामुळे या विवाह सोहळ्यांना ब्रेक लागला होता. लॉकडाऊनचे निर्बंध असल्याने आणि एकत्र येण्यास बंदी असल्याने अनेकांनी विवाहसोहळे नोंदणी पद्धतीने केले. मे महिन्यात विवाह नोंदणी कार्यालयात विवाह करण्यास सुरुवात झाली. मे ते ऑगस्ट महिन्यात ३५०च्या आसपास विवाह झाले. पुढे अनलॉकमध्ये मर्यादित वऱ्हाडींच्या उपस्थितीत लग्न समारंभांना परवानगी देण्यात आली. त्यामुळे अनेकांनी आपला विवाह उरकून घेतला. तर आता काही जण नववर्षाच्या म्हणजेच जानेवारीच्या पहिल्या तारखेचा मुहूर्त साधून लग्नाच्या बेडीत अडकले.
कोरोनाचे नियम पाळून दिला प्रवेशविवाहेच्छुक जोडप्यांनी एक महिना अगोदर नोटीस दिली होती. त्याप्रमाणे, कार्यालयीन वेळात ३० जोडप्याचे विवाह झाल्याचे प्रभारी दुय्यम निबंधक तथा विशेष विवाह अधिकारी गणपत पवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले. कोरोनामुळे आत जोडपे आणि तीन साक्षीदार धरून ५ जणांना प्रवेश दिला जात होता, तसेच कोरोनाचे सर्व नियम पाळणे हे त्यांना बंधनकारक होते, असे पवार यांनी सांगितले.