ठाणे : २०१६ सालापासून रेंटलच्या घरांत वास्तव्यास असलेल्या शहरातील तब्बल ६०६ विस्थापितांना अखेर हक्काची घरे मिळण्यास सुरुवात झाली आहे. ठाण्यातील ब्रह्मांड, कासारवडवली आणि पडलेगाव, दिवा-शीळ येथे बीएसयूपीच्या माध्यमातून उभारलेल्या घरांमध्ये त्यांना हक्काचा निवारा मिळाला आहे. यामध्ये कळव्यातील बुधाजीनगर येथील ८५ रहिवाशांचादेखील समावेश आहे. लॉटरी पद्धतीने ही घरे दिल्याची माहिती महापालिकेने दिली. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत शनिवारी ही लॉटरी काढण्यात आली.
२०१६ सालापासून शहरातील घोडबंदर, जोगिला तलाव परिसर, कळव्यातील शास्त्रीनगर, बुधाजीनगर, लोकमान्यनगर भागातील शास्त्रीनगर ते हत्तीपूल आदी भागांतील रहिवाशांची रस्ते रुंदीकरणात घरे गेली होती. या सर्व रहिवाशांना पालिकेने रेंटलच्या घरात वास्तव्यास ठेवले होते. परंतु, अखेर या ६०६ रहिवाशांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न शनिवारी संपुष्टात आला. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात या रहिवाशांना लॉटरी पद्धतीने हक्काच्या घरांचे वाटप करण्यात आले. या वेळी महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, विरोधी पक्षनेते अशरफ पठाण, माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी आदींसह पालिकेचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात शहरातील विविध रस्त्यांचे रुंदीकरण केले होते. त्यामुळे अनेक रहिवासी विस्थापित झाले होते.
आठ दिवसांत हक्काच्या घरांत प्रवेश
या रहिवाशांच्या घरांची लॉटरी काढली असून यामध्ये त्यांना इमारत, त्यांचा फ्लॅट क्रमांक दिला आहे. त्यानंतर, आता पुढील आठ दिवसांत त्यांना त्यांच्या हक्काच्या घरांत जाता येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. तर, पहिल्या टप्प्यानंतर आता शिल्लक २०२ घरेही दुसऱ्या टप्प्यात लवकरच वितरित केली जाणार आहेत.