- जितेंद्र कालेकर ठाणे - एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २५ वर्षीय प्रेयसीच्या मदतीने ६० वर्षीय आराेपी गाेपीनाथ गवळी या वृद्धाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेबराेबर बलात्कार करतानाचा प्रकारही मोबाइलमध्ये चित्रीकरण करून त्याचा व्हिडिओ तयार केला. हाच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी या दोन्ही आरोपींकडून पिडितेला दिली जात हाेती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गवळी याला अटक केल्याची माहिती भिवंडीच्या शांतीनगर पाेलिसांनी शुक्रवारी दिली. त्याला या घृणास्पद कृत्यामध्ये मदत करणारी त्याची प्रेयसी मात्र पसार झाली असून तिचा शोध घेण्यात येत असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
भिवंडीतील एका भाजी विक्रेत्या महिलेची ही १६ वषीर्य पिडित मुलगी आहे. कहर म्हणजे आरोपी गोपीनाथ हा पीडितेचा नातेवाईक असल्याने त्यांची एकमेकांशी ओळख होती. गाेपीनाथचे एका २५ वर्षीय महिलेशी प्रेमसंबंध आहे. तिचे याआधी दाेन विवाह झाले आहेत. पतीपासून ती विभक्त राहते. जून २०२४ मध्ये पीडित मुलगी यातील आराेपी महिलेच्या घरी भाजी देण्यासाठी गेली होती. त्यावेळी आधीपासूनच गाेपीनाथ हा तिच्या घरात हाेता. मुलगी एकटीच घरात आल्याचा गैरफायदा घेत त्याच्या प्रेयसीने पीडित मुलीच्या अंगावरील कपडे काढले. तर गाेपीनाथ याने पीडित मुलीवर बलात्कार केला.
या घटनेमुळे पीडित मुलगी भयभीत झाल्याने तिने बदनामीच्या भीतीने घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. त्यानंतर ही मुलगी भयभीत असल्याचे पाहून तिला २ जून आणि ५ जून रोजी दोघा आरोपींनी रिक्षातून रामनगर भागातील आरोपी महिलेच्या खोलीवर नेले. तिच्यावर गोपीनाथने पुन्हा बलात्कार केला. खळबळजनक बाब म्हणजे दोन्ही वेळी बलात्कार करताना त्याच्याशी अनैतिक संबंध असलेल्या महिलेने मोबाईल कॅमेऱ्यात या प्रकाराचे चित्रीकरण केले होते. पुन्हा हेच व्हिडिओ चित्रण व्हायरल करण्याची धमकी देऊन यसाची कुठे वाच्यता केल्यास ठार मारून हे व्हिडिओ व्हायरल करु, अशी धमकीही या दाेन्ही आराेपींनी पीडितेला दिली हाेती.
दरम्यान, पीडित मुलगी या घटनेमुळे घाबरून राहत असल्याचे तिच्या मामीच्या लक्षात आले. तिने विश्वासात घेत तिच्याकडे अधिक चौकशी केली असता, हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर ३० जुलै २०२४ रोजी पिडितेला घेऊन तिच्या मामीने शांतीनगर पोलित ठाण्यात तिच्यासोबत गुदरलेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानुसार याप्रकरणी बलात्कारासह पोक्सो तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल केला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेउन आरोपी गोपीनाथला काही तासांतच अटक केल्याची माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली. त्याला मद्दत करणारी आरोपी महिला फरार असून तिचा शोध घेण्यात येत आहे. आरोपीला ३१ जुलै राेजी न्यायालयात हजर केले असता, त्याला ३ ऑगस्टपर्यत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.